Chakan : वाहतूक कोंडीला नागरिकांच्या बेशिस्तीचीही जोड
Chakan : आळंदी फाटा ते मोशी टोलनाका दरम्यान विविध कंपन्यांच्या शोरूमसमोर ग्राहक तसेच इतर वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात.

चाकण : चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप कायम असून, प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग, विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक आणि पुन्हा वाढणारे अतिक्रमण यामुळे कोंडीची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. यामध्ये नागरिक आणि व्यावसायिकांकडून वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघनही कारणीभूत ठरत असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांच्या सहकार्याची गरज व्यक्त होत आहे.
आळंदी फाटा ते मोशी टोलनाका दरम्यान विविध कंपन्यांच्या शोरूमसमोर ग्राहक तसेच इतर वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. गोडाऊन आणि वाहतूक व्यावसायिकांकडूनही मोठी वाहने रस्त्यालगत उभी राहत असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होते. त्यातच काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याने कोंडीत आणखी भर पडते.
आळंदी, चिंबळी, मोई आणि कुरुळी फाट्यांवरील चौकातून गावांकडे जाणारे रस्ते तुलनेने अरुंद आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने वळत असल्याने चौकांमध्ये अडथळे निर्माण होतात. परिणामी वाहनांच्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत होते. भारत फोर्ज कल्याणी ते कुरुळी फाटा, कुरुळी फाटा ते बर्गेवस्ती, चिंबळी फाटा ते मोई फाटा तसेच मोई फाटा ते बर्गेवस्ती या मार्गांवर विरुद्ध दिशेने वाहने ये-जा करत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः मोठ्या वाहनांकडून अशा प्रकारे वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
वाहतूक कोंडीची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून नागरिक आणि व्यावसायिकांचीही आहे. प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांचे सहकार्य यांची सांगड घातल्यास चाकण परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या प्रश्नावर लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा जैसे थे
प्रशासनाने ज्या ठिकाणी अतिक्रमणे हटविली, त्या ठिकाणी निर्माण झालेल्या मोकळ्या जागेचा काही ठिकाणी पुन्हा वाहनतळ म्हणून वापर सुरू झाला आहे. काही ठिकाणी फिरते विक्रेतेही पुन्हा बसू लागल्याने अतिक्रमणविरोधी कारवाईचा परिणाम दीर्घकाळ टिकत नसल्याचे दिसून येत आहे. वाहतूक कर्मचारी कोंडी सोडविण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडत असले तरी नागरिक आणि व्यावसायिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. रस्त्यावर वाहने न उभी करणे, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि विरुद्ध दिशेने वाहन चालविणे टाळणे यासाठी वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे.
सातत्यपूर्ण कार्यवाहीची गरज
चाकण चौकासह परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे काही ठिकाणी सकारात्मक बदल दिसून आले आहेत. मात्र, एका ठिकाणी कारवाई करण्याऐवजी संपूर्ण परिसरातील वाहतूक व्यवस्थेकडे एकात्मिक पद्धतीने पाहण्याची गरज आहे. अनधिकृत पार्किंगला आळा घालणे, विरुद्ध दिशेची वाहतूक रोखणे, रस्ते मोकळे ठेवणे आणि हटविलेली अतिक्रमणे पुन्हा होऊ न देण्यासाठी सातत्याने कार्यवाही करणे आवश्यक आहे.





