पिंपरी – मागील आठवड्यापासून शहरात व धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या धरणाच्या पाणीपातळीत व पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. परंतु शहराला महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा होत आहे. परंतु दूषित आणि पिवळसर आणि मातीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मागील काही दिवसांपासून चिखली, कुदळवाडी, संभाजीनगर, पूर्णानगर आदी परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने नियमित पुरेशा दाबाने महापालिकेने पाणीपुरवठा करावा. पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होत आहे. मागील काही दिवसांपासून मावळात आणि पिंपरी-चिंचवड शहरात पाऊस पडत आहे. त्यामुळे पवना नदीची पाणी पातळी वाढली आहे. परंतु गडूळ पाण्यामुळे महापालिकेच्या पाणीशुद्धीकरण केंद्रातून पाणी व्यवस्थित शुद्ध होत नसल्याने प्रभाग एक, दोन, बारा, तेरा आदी परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना घरातील भांड्यांमध्ये पिण्यासाठी पाणी साठवून ठेवावे लागत आहे. परंतु हंडा अथवा कळशीमध्ये साठविलेल्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. तर कधी पिवळसर रंग दिसून येत आहे. भांड्यांच्या तळाशी गाळ साचून राहत आहे. त्यामुळे महापालिकेकडून केलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अनियमित आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यांना तळमजल्यावर येऊन पाणी वाहून नेहावे लागत आहे. त्यामुळे महिलांना मनक्याचे आजार उद्भवले आहेत. दूषित पाण्यामुळे होणारे आजार सध्या उपनगरांमध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांना जुलाबाच्या (अतिसार) आजाराला सामोरे जावे लागत आहे. लहान मुलांना उलटी, जुलाब होत आहेत. तसेच दूषित पाणी पिल्याने पावसाळ्यात नागरिकांना कावीळ होत आहे. तसेच लहान मुलांना गॅस्ट्रो होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. हात नेहमी स्वच्छ धुवा. बाहेरील तसेच उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. बालकांची काळजी घ्यावी. – डॉ. नवनाथ जाधव, बालरोग तज्ज्ञ. बहुतांश भागात शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी जार घेण्यास सुरुवात केली आहे. तर काही नागरिकांनी आपल्या घरात फिल्टर बसवून घेतले आहेत. तर काही नागरिक दररोज दहा लिटरची पाण्याची बॉटल विकत घेत आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना नहाकचा आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ महापालिकेच्या गलथान कारभारामुळे आली आहे. बॅचलरमध्ये राहणारे तरुण मंदिरांमध्ये बसविलेल्या फिल्टरचे पाणी बॉटलमध्ये भरून नेहत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी बनू पाहत असलेल्या महापालिकेला साधे शुद्ध पाणीपुरवठा करणे अवघड झाले आहे. महापालिकेकडून शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने आरो फिल्टरवाल्यांना सुगीचे दिवस आले आहेत.