खालापूर : शहरातील मिरकुटवाडी फाटा मार्गे खानाव, भोकरपाडा, नारंगी, गोरठण व गोळेवाडी या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सुमारे पाच ते सहा किलोमीटर लांबीचा हा मार्ग पूर्णपणे खड्ड्यांनी भरलेला असून, या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली असून, रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, स्थानिक नागरिक, तसेच शेतकरी वर्ग रोज मोठ्या प्रमाणात प्रवास करत असल्याने रस्त्यावर वर्दळ अधिक आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. दुचाकी, चारचाकी, स्कूल बस व इतर वाहने खड्ड्यांमधून वाट काढत असल्यामुळे वाहनचालक व प्रवासी हैराण झाले आहेत. या मार्गाची दुरवस्था पाहता, हा रस्ता अपघातांना निमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, तातडीने रस्ता दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची चाळण सध्या खालापूर तालुक्यात मुसळधार पावसाचे प्रमाण अधिक असून, संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा मार्ग दिवसागणिक अजूनच खड्डेमय बनत चालला आहे. खड्ड्यांमुळे गाड्यांचे नुकसान तर होतेच आहे, परंतु जीवितहानीचीही शक्यता निर्माण झाली आहे. जर प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर संभाव्य अपघातांना प्रशासनच जबाबदार राहील. – भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते, खानाव