सैनिकांसाठी पदकापेक्षा नागरिकांचे कौतुक अधिक आनंददायी

पुणे : “” स्वत:च्या कुटुंबांना सोडून राहणा-या सैनिकांना घरचा फराळ मिळाला, तर त्यांना आनंद होतो. सीमेवर लढणा-या सैनिकांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या पदकापेक्षा भारतीय नागरिकांनी त्यांच्या प्रती दाखविलेला अभिमान आणि कौतुकाची थाप अतिशय महत्वाचे असते,” असे मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
भारतमाता महिला मंडळ ट्रस्टच्या वतीने महिला आणि युवा स्वयंसेवक काश्मीरमधील 1208 सैनिकांकरीता व 192 नागरिकांकरीता दिवाळी फराळ प्रत्यक्ष घेऊन जाणार आहेत. या फराळाच्या पूजनाचा कार्यक्रम पर्वती पायथा येथील भारतमाता अभ्यासिकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी रा.स्व.संघ पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर, कर्नल महादेव घुगे, सामाजिक कार्यकर्ते गौरव त्रिपाठी, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, आयोजिका प्रियांका शेंडगे-शिंदे, हेमा शिंदे, हेमा तुंगुतकर, आरती पाटसकर, हेमलता अहिरे, उपस्थित होते.
निंबोरकर म्हणाले,”” सर्जिकल स्ट्राइक जेव्हा झाले होते, तेव्हा अनेकांनी भारतीय सेनेचे कौतुक केले. परंतु, त्याचबरोबर अनेकांनी सर्जिकल स्ट्राइकबद्दल प्रश्नदेखील उभे केले. काहींनी हा फार्स आहे, असे देखील म्हटले. भारतीय सेना ही कोणत्याही पक्षाची सेना नसून भारतीय नागरिकांची सेना आहे. भारतीय सेनेला दिलेले कोणतेही मिशन सेना शंभर टक्के यशस्वी करेल, याची नागरिकांनी खात्री बाळगावी.”
प्रियांका शेंडगे-शिंदे म्हणाल्या, भारतीय सैन्यदलातील जवान हे साहस व त्यागाने देशांच्या सीमांचे संरक्षण करतात. आपल्या परिवारापासून दूर राहून ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता ते अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या या अपार देशकार्याला सलाम म्हणून आणि भारतीय नागरिक त्यांच्यासोबत आहेत, या भावनेतून त्यांच्यासोबत आपले सण-उत्सव साजरे करावे, याउद्देशाने काश्मीरमध्ये पुण्यातून 25 युवा स्वयंसेवक जाणार आहेत.



