न्यायाची नवी आशा..! कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच, 40 वर्षांच्या लढ्याला यश!

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांच्या 40 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे नोटिफिकेशन 1 ऑगस्ट 2025 रोजी जारी करण्यात आले असून, 18 ऑगस्ट 2025 पासून त्याचे कामकाज सुरू होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे यांनी हे आदेश जारी केले असून, महाराष्ट्र राज्य पुनर्गठन अधिनियम, 1956 च्या कलम 51(3) अंतर्गत आणि राज्यपालांच्या मान्यतेने हे नोटिफिकेशन महाराष्ट्र गॅझेटमध्ये (असाधारण भाग IV-C, नोटिफिकेशन क्रमांक 41) प्रकाशित झाले आहे.
या सर्किट बेंचमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील वादकऱ्यांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे वेळ आणि खर्चाची मोठी बचत होईल. सर्किट बेंच हे उच्च न्यायालयाच्या खंडपीठापेक्षा वेगळे असून, यामध्ये दोन किंवा तीन न्यायाधीश कार्यरत असतात आणि हे खंडपीठ स्थापनेची पूर्वपायरी मानली जाते.
माजी खासदार संभाजीराजे यांना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी याबाबत प्रथम माहिती दिली आहे. कोल्हापूर येथील सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी अनेक वर्षांपासून आंदोलने आणि मागण्या सुरू होत्या. आता या निर्णयामुळे दक्षिण महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
अनेक वर्षांच्या लढ्याला यश…: संभाजीराजे
दिल्ली येथून नागपूरला हवाई प्रवास करत असताना योगायोगाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे व माझे विमानातील आसन लगतच होते. यावेळी भेट होताच माननीय सरन्यायाधीश महोदय अत्यंत आनंदाने मला म्हणाले की, “राजे, पहिली आनंदाची बातमी तुम्हालाच देतो, कोल्हापूरचे खंडपीठ सर्किट बेंच आजच नोटिफाय झालेले आहे.”
अगदी अचानक खुद्द देशाच्या सरन्यायाधीश महोदयांनीच दिलेली ही आनंदवार्ता ऐकून मन क्षणभर स्तिमित झाले. गेल्या अनेक वर्षांचा कोल्हापूर जिल्ह्यातील वकील बांधवांचा खंडपीठासाठीचा सातत्यपूर्ण लढा डोळ्यांसमोर तरळला.
मी खासदार असताना केंद्रीय स्तरावर केलेला पाठपुरावा नजरेसमोरून गेला. अखेर या अनेक वर्षांच्या लढ्याला यश आल्याचे समाधानही मिळाले आणि खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांकडून ही आनंदवार्ता ऐकायला मिळाली, याचेही मनोमन समाधान व हर्ष वाटला, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी : अनेक वर्षांच्या लढ्याला यश…
आज दिल्ली येथून नागपूरला हवाई प्रवास करत असताना योगायोगाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे व माझे विमानातील आसन लगतच होते. यावेळी भेट होताच माननीय सरन्यायाधीश महोदय अत्यंत आनंदाने मला म्हणाले की,… pic.twitter.com/lKJAtgqOnI
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 1, 2025





