रांजणगाव गणपती : रांजणगाव एमआयडीसीत काम करणाऱ्या चार कामगारांचे अपहरण करुन त्यांना डांबून ठेवत बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून फोन पे द्वारे ७५ हजार रुपयांची खंडणी वसुल करुन अजुन २५ हजारांची मागणी करणाऱ्या खंडणी खोरांकरुन सिनेस्टाईल पद्धतीने अवघ्या एक तासात अटक करण्यात आली आहे. यावेळी अपहरण झालेल्या चार कामगारांची सुटका देखील करण्यात आली आहे. खंडणीखोराला अटक करण्याची धाडसी कामगिरी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. सध्या यासर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सगळीकडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ढोकसांगवी येथे संतोष मनमोहन बेहरा, सुदर्शन नगबहन बेहरा, संतोष सुरिंद्र परिडा, संतोष बसंत बेहरा तसेच अशोक शेट्टी असे पाच जण राहत असुन शनिवार (दि ६ जुलै) संतोष मनमोहन बेहरा आणि संतोष बसंत बेहरा हे दोघेजण पाचंगेवस्ती येथील बाजारामध्ये कामानिमित्त गेलेले असताना तीन दुचाकीवर सहा अनोळखी इसम आले. त्यांनी वरील दोन्ही कामगारांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि पाचंगेवस्ती येथील ते कामगार राहत असलेल्या खोलीवर नेले. त्यानंतर त्यांनी या कामगारांचे दोन मित्र सुदर्शन नबगन आणि संतोष परिडा यांना खोलीच्या बाहेर बोलावले आणि त्या दोघांनाही जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. तीन दुचाकीवर या चार जणांना घेऊन पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या एका चार मजली इमारती मधील तिसऱ्या मजल्यावर एका खोलीत नेले. तसेच आरोपी योगेश बारवकर याने मानस बेहरा याच्या मोबाईलवर फोन करुन “तेरे भाई और तिनो दोस्तो के हर एक अकाउंट पे २५ हजार भेज दो, नही तो मैं उनको मार दूंगा..’ अशी धमकी दिली व प्लास्टिकचा पाईप आणि कंबरेच्या बेल्टने या चारही कामगारांना मारहाण केली. या चार कामगारांकडे पैसे नसल्याने त्यांनी गावी फोन करुन सहा जणांनी आमच्या चौघांचे अपहरण केले असुन आमच्या प्रत्येकाच्या अकाउंटला २५ हजार रुपये याप्रमाणे ७५ हजार पाठवा. अन्यथा हे सहाजण आम्हाला जिवे ठार मारतील असे सांगितले. त्यानंतर तीन कामगारांच्या घरातील व्यक्तींनी फोन पे द्वारे २५-२५-२५ असे ७५ हजार रुपये त्या तिघांच्या अकाउंटला पाठवले. त्यानंतर आरोपी योगेश बारवकर याने तिघांच्या फोन पे वरुन ते ७५ हजार रुपये त्याच्या मित्राच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. परत मानस बेहरा याला फोण करुन संतोष सुरेंद्र परिडा याचे २५ हजार रुपये लवकर पाठव अन्यथा त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. पोलिसांनी रचला सिनेस्टाईल सापळा… त्यानंतर मानस बेहरा याने आरोपी योगेशला कारेगावच्या चौकात पैसे घेऊन येतो असे सांगितले. त्यानंतर मानसने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधत हा अपहरणाचा सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे, पोलिस हवालदार संदीप जगदाळे, विलास आंबेकर, राजेश कर्डीले, प्रतिक खरबस, संदीप भांड यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी एम एच १२ व्ही सी ४८७९ या चारचाकी गाडी मध्ये अपहरण केलेल्या तीन कामगारांना घेऊन योगेश बारवकर आणि विनोद चाबुकस्वार हे कारेगावच्या चौकात आले. अपहरण केलेल्या कामगारांची सुटका… त्यानंतर सापळा रचलेल्या पोलिसांनी चारचाकी गाडीत असलेल्या चार कामगारांची तातडीने सुटका करत आरोपीला पकडण्यासाठी धाव घेतली. परंतु योगेश बारवकर तेथून पळुन गेला. तर यातील एक आरोपी विनोद राजेंद्र चाबुकस्वार याला पोलिसांनी अटक केली असुन त्याला शिरुर न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे संतोष मनमोहन बेहरा (वय १९) सध्या रा. ढोकसांगवी, व्हील्स इंडिया कंपनीच्या पाठीमागे, मूळ रा. समरपुर ता. अहलापुर, जि. जासपुर, उडीसा याने फिर्याद दाखल केल्याने योगेश बारवकर, विनोद चाबुकस्वार तसेच त्यांच्या इतर पाच साथीदारांविरोधात चार कामगारांचे अपहरण करुन खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे हे करत आहेत. दरम्यान, रांजणगाव एमआयडीसीत परप्रांतीय कामगारांना मारहाण करुन धमकावणे असे अनेक गैरप्रकार होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मारहाणीच्या भीतीने अनेकजण तक्रार दाखल करत नाहीत, परंतु जर अशी कोणाची फसवणूक होत असल्यास त्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा. असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.