सिनेमॅटिक : स्टार किड्सची “हट के चाल’

– सोनम परब
सध्या बॉलीवूडमध्ये आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकण्याऐवजी तसेच काही कलाकारांच्या मुला-मुलींनी ग्लॅमर इंडस्ट्रीऐवजी अन्य व्यवसायात जम बसवला आहे.
बॉलीवूडमध्ये गेल्या काही काळापासून स्टार किड्सचा दबदबा राहिला आहे. दरवर्षी कोणता ना कोणता स्टार किड्स चित्रपटात पाऊल टाकतो, तेव्हा त्याची जोरदार चर्चा होते. आगामी काळात देखील हे स्टार किडस वडिलांप्रमाणेच स्टारडम मिळवतील, असे चाहत्यांना वाटू लागते. चित्रपट तारकांच्या या मुलांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला आणि नावलौलिक मिळवला. किशोरकुमार यांचा मुलगा अमीतकुमार यांनी देखील गायन क्षेत्रात आपला ठसा उमटविला.
स्टार किड्स हे आपले पालक चित्रपट उद्योगात असल्याचा फायदाही घेतात आणि त्याचा लाभही मिळतो. पृथ्वीराज कपूरपासून रणबीर कपूरपर्यंतच्या तीन पिढ्या बॉलीवूडमध्ये सक्रिय राहिल्या आहेत. मात्र सर्व स्टारकिड्स असे करत नाहीत. परंतु काही मुलं यास अपवाद असल्याचे दिसून येतात. ही मंडळी चित्रपट सोडाच पण प्रत्यक्ष आयुष्यात देखील प्रसिद्धीपासून दूर राहण्याचाच विचार करतात. ते स्वत:चाच मार्ग निवडतात आणि त्यात यशस्वी देखील होतात.
वेदांत माधवन : अभिनेता आर. माधवन याचा मुलगा जलतरणपटू वेदांत माधवन सध्या चर्चेत आहे. खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 मध्ये महाराष्ट्राकडून खेळताना वेदांतने या स्पर्धेत सात पदकं जिंकली. त्यापैकी पाच सुवर्ण आणि दोन रौप्य आहेत. वडील प्रसिद्ध अभिनेते असूनही वेदांतने क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. एवढेच नाही तर त्याने राष्ट्रीय पातळीवर देखील ओळख प्रस्थापित केली आहे. अलीकडेच माधवनने आपल्या मुलाबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रिद्धीमा कपूर साहिनी : बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारे कपूर कुटुंबीयांतील ऋषी कपूर आणि नीतू कपूर ही जोडी प्रसिद्ध आहे. पण त्यांची कन्या रिद्धिमा कपूर साहिनीने कधीही चित्रपट उद्योगाला प्राधान्य दिले नाही. तिने डिझायनिंगकडे आपले लक्ष वळविले. आज ती एक यशस्वी ज्वेलरी डिझायनर म्हणून वावरत आहे.
रिहा कपूर : 1990 च्या दशकांत बॉलीवूडमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या अनिल कपूरची मोठी कन्या सोनम कपूरने देखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपटात करिअर केले. दुसरी कन्या रिया कपूर मात्र या उद्योगापासून लाबंच राहिली. ती निर्माती आहे आणि फॅशन डिझायनर म्हणूनही ओळखली जाते.
अंशुला कपूर : प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांची कन्या आणि अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर ही सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. अंशुला आतापर्यंत कधीही चित्रपटात दिसली नाही. अर्थात काही काळापूर्वी ती एका मॉडेलिंग कार्यक्रमात दिसली होती. अंशूला कपूर ही गूगलची कर्मचारी राहिली आहे आणि त्यानंतर तिने ऋतिक रोशनच्या एका ब्रॅंडमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम केले आहे.
शहिन भट्ट : चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांची कन्या शाहीन भट्ट ही नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिली. बॉलीवूडचे जीवन तिने जवळून अनुभवले आहे आणि तिचा याकडे वळण्याचा अजिबात इरादा नाही. ती चांगले लेखन करते.
कृष्णा श्रॉफ : कृष्णा श्रॉफ ही जॅकी श्रॉफची कन्या आहे. तिने आपल्या वडिलांप्रमाणे आणि भावाप्रमाणे करिअरसाठी चित्रपटाची निवड केली नाही. ती सोशल मीडिया इन्फ्लून्सर म्हणूनही ओळखली जाते. तिला फिटनेस क्षेत्राची विशेष आवड आहे. 2018 मध्ये कृष्णा श्रॉफने मुंबईत मिक्स मार्शल आर्टचे एक जीम सुरू केले. ती फंक्शनल ट्रेनिंगला देशभरात प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम करत आहे. अर्थात चित्रपट “मुन्ना मायकल’ साठी कृष्णाने सहायक दिग्दर्शकाची भूमिका बजावली. शिवाय तिने मिक्स मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतलेले आहे.
अबराम खान : शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम खान हा मार्शल आर्ट तायक्वोंदोचे प्रशिक्षण घेत आहे. हे प्रशिक्षण त्याने मोठ्या भावाकडून आर्यन खानकडून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी आयोजित एका स्पर्धेत अबरामने पदकही जिंकले होते.
रियान आणि राहिल देशमुख : रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा यांचे पुत्र रियान आणि राहिल देशमुख यांची क्रीडा क्षेत्रात विशेष रुची आहे. दोघांनाही फुटबॉल खेळणे आवडते. रितेश आणि जेनेलिया हे मुलांचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ नेहमीच शेअर करत असतात. रियान आणि राहिल देशमुख हे बार्सिलोना फुटबॉल अकादमीतून फुटबॉलचे प्रशिक्षण घेत आहेत.
श्वेता बच्चन : महानायक अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चनने चित्रपटांत येण्याबाबत रस दाखविला नाही. पालकांनीही तिच्यावर कधीही दबाव आणला नाही. अर्थात बॉलीवूड इंडस्ट्री ही तिच्या करिअरसाठी उत्तम निवड राहिली असती. पण तिने लेखन क्षेत्र निवडले. तिचे आजोबा हरिवंशराय बच्चन हे हिंदी भाषेतील प्रसिद्ध कवी म्हणून ओळखले जातात. श्वेता ही नामांकित लेखक आणि स्तंभलेखक म्हणून नावारुपास आली आहे.
नव्या नवेली नंदा : अमिताभ बच्चन यांची नात असलेली नव्या नवेली नंदा ही अनेक पार्टीत दिसते. नव्याला सर्वकाही सहजपणे मिळाले असते. परंतु तिने वेगळा मार्ग निवडला आणि ती यशस्वी उद्योगपती बनली. वॉट द हेल नावाचा पॉडकास्ट ती चालवते. नंदा ही आरा हेल्थची सहसंस्थापक आणि सीईओ आहे. नव्या हिने 2020 मध्ये न्यूयॉर्क येथे फॉरडम यूनिर्व्हर्सिटीतून शिक्षण घेतले.
न्यासा देवगन : अजय देवगन आणि काजोलची मुलगी न्यासा ही गेल्या काही दिवसांपासून माध्यमांच्या चर्चेत आहे. बॉलीवूड मंडळीत तिचा वावर असला तरी कॅमेरासमोर ती कधीही गेली नाही. न्यासा ही काजोल आणि अजय यांच्याप्रमाणे कलाकार नाही. अन्य स्टार किड्सबरोबर तिचाही फोटो क्लिक होतो. परंतु तिने अद्याप करिअर निवडलेले नाही.
त्रिशाला दत्त : संजय दत्त आणि ऋचा शर्मा यांची कन्या त्रिशाला ही अन्य स्टार किड्सप्रमाणे चित्रपटात प्रवेश करण्याबाबत फारशी उत्सुक राहिली नाही. ती एक फॅशन एंटरप्रेन्योर असून ब्लॉगर देखील आहे. तिने न्यूयॉकमधील जय कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टीसमध्ये शिक्षण घेतले असूने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणापासूनच ती लंडनमध्ये वाढली आहे. ती आता मानसोपचार तज्ज्ञ म्हणून वावरते.
अर्पिता खान : एकाहून एक सरस पटकथा लिहणारे लेखक सलीम खान यांनी एकदा अर्पिताला रस्त्यावर रडत असताना पाहिले आणि त्यांनी तिला दत्तक घेतले. अर्पिता खान ही आता फॅशन डिझायनर आहे आणि स्टायलिस्ट म्हणून ओळखली जाते. भाऊ सलमान खानबरोबर नेहमीच दिसते.
छाया टंडन : अभिनेत्री रविना टंडनने छाया नावाच्या मुलीला दत्तक घेतले. आज ती विवाहित असून ती हवाई सुंदरी म्हणून कार्यरत आहे.
आलिया कश्यप : दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची कन्या आलिया कश्यप ही सध्या यूट्यूबवर जीवनशैली, फॅशन, ब्यूटी ब्लॉग चालवते. आलियाने आपल्या चॅनेलवर वडिलांना अनेकदा बोलावले आणि अनेक विषयांवर मोकळेपणाने चर्चा देखील केली.





