मेसन : अव्वल मानांकित असणाऱ्या इटलीच्या जॅनिक सिनरने अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोला तर दुसऱ्या मानांकित बेलारूसच्या अरिना सबालेन्काने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाला पराभूत करताना करताना सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद साकारले. पुरुष गटाच्या एकेरीत इटलीच्या जॅनिक सिनर समोर अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोचे तागडे आव्हान होते. मात्र, जॅनिकने सरळ सेटमध्ये ७-६(४), ६-२ टियाफोचे आव्हान परतवून लावले. सिनर आणि टियाफो हे दोघेही त्यांच्या पहिल्या सिनसिनाटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होते. टियाफोने पहिल्या सेटमध्ये टायब्रेकर मिळविला. मात्र टियाफोकडून तीन चुका झाल्याने त्याला पहिला सेट ७-६ असा गमवावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये सिनरने ५-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सिनरने टियाफोला कोणतीही पुनरागमनाची संधी दिली नाही. सन २००८ साली २१ वर्षीय अँडी मरेने ही स्पर्धा जिंकून सर्वात कमी वयाचा विजेता होण्याचा मान मिळविला होता. त्यानंतर जॅनिक सिनर या २३ वर्षीय खेळाडूने विजेतेपद मिळविताना अँडी मरेनंतर कमी वयातील विजेता होण्याचा मान मिळविला. आज मिळविलेल्या विजेतेपदाचा नक्कीच आनंद आहे. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या युएस ओपन स्पर्धेच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची स्पर्धा होती. त्यामुळे या स्पर्धेत खेळल्याचा मला निश्चित फायदा होईल, अशी भावना इटलीच्या जॅनिक सिनर याने बोलून दाखविली. महिला गटात बेलारूसच्या अरिना सबालेन्काने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाला ६-३, ७-५ असे पराभूत करताना ऑस्ट्रेलियन ओपननंतरचे पहिले विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीतील अरिनाने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना ६-३ असा पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये अरिनाने ५-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र जेसिका पेगूलाने पाच गुणांची कमाई करताना ५-५ अशी लढत बरोबरीत आणली होती. मात्र मोक्याच्या क्षणी अरिनाने पुन्हा एकदा खेळ उंचावला. दोन गुण मिळविताना सेट आणि विजेतेपद दोन्ही पटकावले. अरिनाने शेवटपर्यंत चांगला खेळ केला. कधीच तिचा खेळ खाली आला नाही. तिची सर्व्हिस देखील चांगली आहे. त्यामुळे यूएस ओपन स्पर्धेसाठी अरिना सबालेन्का ही फेव्हरिट असू शकते, अशी प्रतिक्रिया जेसिका पेगुलाने पराभवानंतर दिली.