सीआयए’ने आखली होती विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना ठार मारण्याची योजना

न्यूयॉर्क – विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांना ठार मारण्याची योजना अमेरिकेची गुप्तचर संघटना “सेंट्रल इंटिलीजन्स एजन्सी’ अर्थात “सीआयए’ने केली होती, अशी माहिती एका अहवालातून उघड झाली आहे.
असांज हे लंडनमधील इक्वाडोरच्या दूतावासात बंदिस्त असताना त्यांचे अपहरण करण्याची, विषप्रयोग करण्याची अथवा त्यांची हत्या करण्याची योजना होती. असे या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेच्या 30 माजी अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी संभाषणाच्या आधारे हा अहवाल तयार केला गेला आहे.
यापैकी 8 जणांच्या संभाषणामधअये असांज यांच्या कथित अपहरणाबाबतच्या योजनेचा तपशीलही आला आहे. “याहू न्यूज’ या माध्यम समूहाच्या वेबसाईटने याबाबचचे वृत्त दिले आहे.
ठ्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळामध्ये विकीलीक्स विरोधात काय आणि कसे कारस्तान केले जात होते, याची धक्कादायक माहिती या अहवालामुळे उघड झाली आहे.
अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी या मोहिमेचे नेतृत्वच केले होते. कायद्याला धाब्यावर बसवून या कारस्थानाची अंमलबजावणी केली जाणार होती. असांज यांना संपवण्यासाठीच ही योजना आखली जात होती.
मात्र या संदर्भात “सीआयए’ने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर पॉम्पेओ यांनी तर कोणत्याही प्रश्नांना उत्तरेही दिलेली नाहीत. दुसरीकडे असांज यांची हत्या करण्याची कोणतीही योजना आपल्या प्रशासनाकडून केली गेलेली नव्हती, असे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.





