गेल बनला 14 हजारी मनसबदार

सेंट ल्युसिया – वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज व मिस्टर युनिव्हर्स ख्रिस गेलने टी-20 क्रिकेट सामन्यामध्ये 14 हजार धावा करणारा पहिलाच क्रिकेटपटू बनण्याचा विक्रम साकार केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या टी -20 सामन्यात गेलने 38 चेंडूत 67 धावा केल्या. त्यात गेलने 7 षटकार आणि 4 चौकार फटकावले.
गेलने या सामन्यामध्ये टी -20 क्रिकेटमधील 14 हजार धावा पूर्ण केल्या. टी -20 क्रिकेटमध्ये हा पल्ला गाठणारा गेल जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. गेलच्या दमदार फलंदाजीमुळे वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवला.
सामन्याच्या दुसऱ्यास षटकातील शेवटच्या चार चेंडूंत गेलने 18 धावा करताना 6,4,4,4 अशी फटकेबाजी केली. गेलने ऍडम झम्पाच्या षटकात सलग तीन षटकार मारून 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 2016 सालानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील हे त्याचे पहिलेच अर्धशतक आहे. या विजयासह वेस्ट इंडीजने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 141 धावा केल्या. मोईसेस हेनरिक्सने 33 धावा केल्या तर वेस्ट इंडीजकडून हेडन वॉल्श ज्युनियरने 18 धावा देऊन दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने 4 गडी गमावून 142 धावा करत हा सामना जिंकला.





