मुंबई – विविध पक्षातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांची कथित व्हिडीओ क्लिप एका वृत्त वाहिनीने प्रसारित केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी यावर कडक शब्दात भाष्य देखील केले होते. पावसाळी अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं. या सर्व घडामोडींदरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ मात्र शांतच होत्या. मात्र आता वाघ यांनी या सर्व प्रकाराबाबत भाष्य केलं आहे.
चित्रा वाघ या अनेकदा महिलांबाबतचे प्रश्न आक्रमकपणे मांडताना दिसतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरु असलेल्या महिलांवरील अत्याचार आणि त्याबाबतचे व्हायरल होणारे व्हिडीओ तसेच भाजप नेत्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ याबाबत चित्रा वाघ यांनी कोणतेच मत व्यक्त केले नव्हते. आता वाघ यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य केलं आहे.
किरीट सोमय्या यांच्या क्लिपबाबत बोलताना वाघ म्हणाल्या,”किरीट सोमय्या प्रकरणी कुणी ताई समोर आली पाहिजे. जो प्रकार झाला तो चुकीचा झालाच आहे. या प्रकाराने आम्हाला धक्का बसला आहे. भविष्यात याची पाळंमुळं शोधली जातील. तसेच गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाऊसमध्ये याबाबत आश्वासन दिलं आहे असंही वाघ यावेळी म्हणाल्या.
मणिपूरच्या घटनेबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या,”या घटनेचा मी निषेध करते. या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी देखील भाष्य केले आहे. विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे. असं स्पष्ट मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे.