चित्रा वाघ म्हणाल्या,’आमचं सरकार कुठेही कमी पडलेले नाही…’

CHITRA WAGH । महाविकास आघाडी सरकारने बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या २४ तारखेला बंदची हाक दिली आहे. यावरून आता महायुती सरकारमधील नेते टीका करत आपली बाजू मांडत आहे. भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र बंद वरून मविआला चांगलेच सुनावले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या,’२ ४ तारखेला मविआने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बंदची हाक दिली आहे. मात्र मला त्यांना काही घटनांची आठवण करून द्यायची आहे. अशी घटना कुठेही घडली तरी ती राज्यासाठी लज्जास्पद आहे. आमचे सरकार कुठेही कमी पडलेले नाही. या घटनेवर सरकारने त्वरित कारवाई केली आहे. ज्या ज्या गोष्टी हव्या, त्या तात्काळ केल्या. एसआयटी स्थापन केली. ज्या पोलिसांनी कारवाईत कसूर केली, त्यांना निलंबित केले. उज्ज्वल निकम सारख्या वकिलांची नेमणूक केली. लहान मुलीकडून माहिती घेणे पोलिसांसाठी टास्क आहे” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या,’बदलापूरमधील रहिवाशांनी सांगितले की 10 वाजेपर्यंत आम्ही होतो. त्यानंतर दुसरे लोक आले. त्यांच्या हातात बॅनर आले. लाडकी बहिण योजना नको. नेमके कशासाठी आपण आलो होतो. बदलापूर घटनेत न्याय हवा की लाडकी बहिण योजना नको म्हणून आलो होतो?” असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.
दरम्यान, उद्धव ठाकरे या संपविषयी म्हणाले,”उद्याचा बंद हा महाराष्ट्राच्या जनेतसाठी आहे. हा बंद विकृती विरोधी संस्कृती आहे. बऱ्याच पालकांना आपले मुलं शाळेत सुरक्षित आहे का? याची भीती वाटत आहे. याला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद आहे. उद्याचा बंद महाविकास आघाडीतर्फेच नाही तर सर्व जनतेचा बंद आहे. सर्वांना या बंदात सहभागी व्हा, तसेच उद्याचा बंद कडकडीत असावा बंद काळात ज्या अत्यावश्यक सेवा आहे त्या चालू राहतील. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळावा. दुकानदारांनाही उद्या बंद पाळावा,” असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.





