Chitali Murder Case : खटाव हादरलं! माजी सैनिकाची गावातच निर्घृण हत्या; जुन्या वादातून तलवारीने केला वार
Chitali Murder Case : हत्येनंतर मायणी पोलिसांनी ४ जणांना केली अटक, तर मुख्य आरोपी फरार; गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.

Chitali Murder Case – जुन्या भांडणाचा राग मनात धरून चितळी, ता. खटाव येथील माजी सैनिक रणजित मदन निकम यांना धारदार शस्त्रांचा वापर करून जिवे मारल्याची गंभीर घटना घडली आहे. यापैकी चार संशयितांना पोलिसांनी शिताफीने अटक केली असून एकजण परागंदा आहे. या संदर्भात मायणी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी,
चितळी, ता. खटाव येथील रहिवाशी रणजीत निकम हे सुमारे चार वर्षांपूर्वी सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर ते चितळी गावी शेती करीत होते. गेल्या चार महिन्यापूर्वी त्यांचे व गावातील पृथ्वीराज संभाजी पवार यांच्यात भांडण झाले होते. त्या संबंधाने त्यावेळी एकमेकांविरोधात दोघांनी पोलीस ठाण्यामध्ये केस दाखल केली होती.
त्यावेळी सर्वांवर कारवाई झाली होती. तेव्हापासून पृथ्वीराज पवार हा रणजीत निकम यांच्यावर चिडून होता. बुधवार दि. 18 रोजी सायंकाळी भाऊ अभिजीत मदन निकम वय 36 वर्ष रा. चितळी हा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असताना रणजीत कदम हे गावाच्या तालमीकडे मोटरसायकल वरून चालले होते.
थोड्याच वेळात तेथून जवळच असलेल्या तालमीकडे आरडाओरडा झालेला आवाज आल्याने भाऊ अभिजीत निकम हे तालमीकडे गेले. त्यावेळी रणजीत निकम यास पृथ्वीराज संभाजी पवार व पवन संतोष पवार हे तलवारीने, भरत शशिकांत पवार हा कुर्हाडीने भावाला मारहाण करीत असल्याचे दिसले.
त्यावेळी पृथ्वीराज पवार हा रणजीत यास तुला आता जिवंत ठेवत नाही, तुला आता आम्ही संपवतो, असे म्हणून रणजीत निकम यांच्या डोक्यात, हातापायावर, पाठीवर व पोटावर तलवारीने कुर्हाडीने वार केले. त्यावेळी संतोष महादेव पवार व विश्वजीत उर्फ यश संतोष पवार हे त्याच्या हातातील कोयता घेऊन लोकांना हाताने ढकलून जवळ येऊ नका असे धमकावत होते.
मात्र काहीजण पुढे आले असता ते सर्वजण तेथून पळून गेले. मारहाणीनंतर रणजीत निकम याना उपचारांसाठी मायणी येथील लाईफ लाईन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून ते मयत झाले असल्याचे सांगितले. नंतर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अभिजीत मदन निकम रा. चितळी यांनी मायणी पोलीस दूर क्षेत्रामध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पृथ्वीराज संभाजी पवार, पवन संतोष पवार, एक विधीसंघर्षग्रस्त बालक व संतोष महादेव पवार यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. यातील भरत पवार परागंदा आहे.
घटनास्थळी दहिवडीचे उप अधीक्षक रणजीत सावंत, वडूजचे निरीक्षक घनःशाम सोनवणे, यांनी भेट देऊन घटनेची अधिक माहिती घेतली. चितळीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खुनाचा पुढीलतपास मायणी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विक्रांत पाटील करीत आहेत.





