चिराग पासवान यांचा नितीशविरोध मावळला!

नवी दिल्ली : एनडीए बिहारमधील पुढील विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्यामुळे लोक जनशक्ती पक्षाच्या (लोजप) एका गटाचे प्रमुख असणाऱ्या चिराग यांचा नितीशविरोध मावळल्याचे सूचित होत आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींशी बोलताना चिराग यांनी नितीश यांच्या कार्याची प्रशंसा केली. बिहारमधील आधीच्या राजद राजवटींच्या तुलनेत नितीश यांनी मुख्यमंत्री म्हणून खरोखरीच चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी म्हटले. नितीश यांच्याविषयीची भूमिका बदलल्या बद्दलचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. एकदा आघाडीचा भाग बनल्यानंतर मनापासून योगदान द्यायला हवे. अन्यथा, आघाडीचे नुकसान होईल आणि आमच्या कामगिरीवरही प्रतिकूल परिणाम होईल, असे उत्तर त्यांनी दिले.
नितीश यांचे कट्टर विरोधक म्हणून काही काळापूर्वी चिराग यांच्याकडे पाहिले जात होते. बिहारमध्ये २०२० या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक झाली. त्याआधी चिराग यांनी भाजप आणि नितीश यांच्या जेडीयूचा समावेश असणाऱ्या एनडीएबरोबरचे संबंध तोडले. त्यासाठी चिराग यांचा नितीशविरोध कारणीभूत ठरला. त्या निवडणुकीनंतर नितीश यांनीही काही काळासाठी भाजपबरोबरची मैत्री तोडली. मात्र, यावेळच्या लोकसभा निवडणुकीआधी चिराग आणि नितीश यांच्या पक्षांनी पुन्हा भाजपशी जुळवून घेतले. ते पक्ष एनडीएचे घटक म्हणून एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. एनडीएने केंद्रात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. चिराग यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. आता त्यांनी नितीश यांच्याशी जुळवून घेतल्याचे दिसून येत आहे.





