Chirag Paswan : मुख्यमंत्रिपदाची कुठलीही आकांक्षा नाही; चिराग पासवान यांनी केले स्पष्ट

पाटणा : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी पुन्हा स्वत:च्या विधानसभा निवडणूक लढवण्याविषयीचे संकेत दिले. मात्र, तसे पाऊल उचलण्यामागे मुख्यमंत्रिपदाची कुठलीही आकांक्षा नसल्याची स्पष्टोक्तीही केली. चिराग यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाचा (लोजप) गट बिहारमधील सत्तारूढ एनडीएचा घटक आहे. त्या राज्यात चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून स्वत: चिराग उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
संबंधित शक्यतेची चाचपणी करत असल्याची भूमिका ते वारंवार मांडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या आकांक्षेविषयीचा प्रश्न विचारला. उत्तरादाखल त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर नजर असल्याचा स्पष्ट इन्कार केला. आगामी निवडणुकीत आमच्या पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला रहावा यासाठी मी स्वत: लढण्याचा विचार करेन.
आमच्या पक्षाची कामगिरी चांगली झाल्यास एनडीएलाही लाभ होईल. माझी मुख्यमंत्रिपदावर नजर असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. त्यासाठी आमच्या आघाडीतूनच प्रयत्न होत असल्याची खंत वाटते. आगामी निवडणुकीनंतर बिहारमध्ये पुन्हा एनडीएचेच मजबूत सरकार दिसेल. त्याचे नेतृत्व मुख्यमंत्री नितीश कुमार हेच करतील असे भाकीत करतो, असे ते म्हणाले.




