पाटणा : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधला. किशोर यांच्या राजकारणाची स्टाईल आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासारखी आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली. बिहारमधील विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी किशोर यांनी केली आहे. प्रचाराचा भाग म्हणून विविध भागांचे दौरे करताना ते प्रामुख्याने सत्तारूढ एनडीएच्या बिहारमधील मंत्र्यांना लक्ष्य करत आहेत. त्यावर चिराग यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. किशोर एकामागून एक आरोप करत आहेत. त्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे की ते खोटे आरोप आहेत; ते चौकशीनंतरच समजेल. पण, किशोर यांनी अवलंबलेल्या राजकारणाची स्टाईल याआधी दिल्लीत पाहावयास मिळाली. आपचे एक नेते (केजरीवाल) बड्या नेत्यांवर आरोप करायचे. पण, मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी संबंधित आरोपांविषयी पूर्णपणे मौन बाळगले, असे चिराग म्हणाले. बिहारमध्ये जेडीयू, भाजप आणि इतर पक्षांचा समावेश असणाऱ्या एनडीएची सत्ता आहे. लोक जनशक्ती(रामविलास) हा चिराग यांच्या नेतृत्वाखालील पक्ष त्या आघाडीचा घटक आहे.