नवी दिल्ली : लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहारच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना केंद्रीय राजकारणात जास्त काळ राहायचे नाही, बिहार त्यांना बोलावत आहे असे चिराग यांनी म्हटले आहे. राज्यात यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चिराग पासवान यांनी केलेले हे विधान अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे. चिराग पासवान म्हणाले, माझ्या राजकारणाचा पाया बिहार प्रथम, बिहारी प्रथम यावर आधारित आहे. माझे राज्य मला हाक मारत आहे. माझे वडील रामविलास पासवान केंद्रीय राजकारणात अधिक सक्रिय होते, परंतु माझी पहिली प्राथमिकता बिहार आहे. मी जास्त काळ केंद्रात राहू शकत नाही. तथापि, त्यांनी स्पष्ट केले की ते २०२५ च्या विधानसभा निवडणुका स्वतः लढवणार नाहीत, परंतु २०३० च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारच्या राजकारणात परततील. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि तरुण त्यांच्याकडे सतत बिहारच्या राजकारणात सक्रिय राहण्याची मागणी करत आहेत. त्यांच्या सभांमध्ये लोकांची गर्दी दाखवते की बिहारमध्ये माझी जबाबदारी आहे. दरम्यान, चिराग पासवान यांच्या विधानावर भाजप प्रवक्ते प्रभाकर मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हनुमान म्हणून प्रसिद्ध असलेले चिराग पासवान यांनी बिहारच्या राजकारणात सक्रिय होण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे, असे ते म्हणाले. तुमचे वडील रामविलास पासवान केंद्रात मंत्री असताना बिहारच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. रेल्वेमंत्री असताना, रामविलास पासवान यांनी रेल्वे मार्गांचे जाळे टाकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. ते म्हणाले की, चिराग पासवान यांनी कोणत्याही पदावर असताना त्यांच्या वडिलांच्या शिकवणींचे पालन केले. दलित समाजाच्या विकासासाठी एनडीए केंद्र सरकारने घेतलेले निर्णय या वर्गापर्यंत पोहोचवण्यात ते मागे राहीले नाहीत. आता राज्याच्या राजकारणात सक्रिय असल्याच्या त्यांच्या विधानामुळे, यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला दलितांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.