दक्षिण चीन समुद्रात चीनचा युद्धसराव

बीजिंग – दक्षिण चीन समुद्र भागात चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) युद्धाभ्यास करत आहे. एवढेच नाहीतर आता चीनने येथे लढाऊ विमानेदेखील तैनात केली आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून येथे तणावाची स्थिती आहे. अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात लढाऊ विमाने पाठवल्यानंतर आता चीनकडून देखील सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.
चीनच्या राष्ट्रीय रेडिओनुसार, “पीएलए’चे संपूर्ण ब्रिगेड दक्षिण चीनमध्ये हैनाना भागात समुद्र हल्ल्याची तयारी करत आहे. यादरम्यान लढाऊ जेएच-7 बॉम्बरचादेखील सराव करण्यात आला. हा युद्धाभ्यास गुरुवारपर्यंत सुरू राहणार आहे. तर दुसरीकडे फॉर्ब्सने दावा केला आहे की, चिनी सैन्याने या भागात आपले “जे-11 बी’ फायटर जेट्स तैनात केले आहेत. अमेरिकी लढाऊ विमानांना इशारा देण्यासाठी चीनने असे केले आहे.
मात्र, अमेरिकेने मागील दोन आठवड्यांत अनेक लढाऊ विमानांच्या युद्धसरावासाठी या भागात पाठवले. याशिवाय अमेरिकेच्या युद्धनौकादेखील या भागात पाहण्यात आले होते. याच कारणामुळे चीन भडकला आहे; परंतु चीनने दावा केला आहे की त्यांचा हा युद्धाभ्यास काही नवीन नसून, अशाप्रकारचे युद्धसराव सुरूच असतो. मे महिन्यापासूनच या भागात पाणबुड्याविरोधी विमाने, कंट्रोल सिस्टमला तैनात करण्यात आले आहे.





