China: देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्याला फाशी

बीजिंग – चीनमध्ये आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी माजी सरकारी अधिकाऱ्याला फाशी देण्यात आले. चीनच्या उत्तरेकडील इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील माजी अधिकारी ली जियानपिंग यांना तब्बल ४१२ दशलक्ष डॉलरच्या गैरव्यवहाराबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. ली हे सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या कार्यकारी कमिटीमध्ये आर्थिक आणि तांत्रिक विकास क्षेत्रासाठीचे सचिव होते.
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपात दोषी आढळल्यानंतर त्यांना सप्टेंबर २०२२ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या या शिक्षेवरील अपिलावरील सुनावणी दरम्यान त्यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली होती. सर्वोच्च पीपल्स न्यायालयाने या शिक्षेला मंजूरी दिल्यानंतर इनर मंगोलिया न्यायालयाकडून या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. चीनमधील सरकारी वृत्तसंस्थेने याबाबतची माहीती दिली आहे.
तब्बल ३ अब्ज युआन (४२१ दशलक्ष डॉलर)चा अपहार केल्याप्रकरणात ली यांना दोषी ठरवण्यात आले होते. चीनच्या इतिहासामध्ये हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे प्रकरण मानले जाते आहे.
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर करडी नजर
शी जिनपिंग हे २०१२ मध्ये चीनचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहिमेला आपल्या प्रशासनात विशेष महत्व दिले आहे. या मोहिमेत दोन संरक्षण मंत्री आणि डझनभर लष्करी अधिकाऱ्यांसह दहा लाखांहून अधिक पक्षाच्या अधिकाऱ्यांवर खटला भरण्यात आला आणि त्यांना शिक्षा झाली आहे. आतापर्यंत ४५ उच्च दर्जाच्या कॅडरच्या विक्रमी संख्येची चौकशी सुरू केली आहे. यावर्षी ही संख्या ५४ वर पोहोचली आहे, असे सेंट्रल कमिशन फॉर डिसीप्लीन इन्सपेक्शनने म्हटले आहे.





