चीन पुन्हा चिंतेत! चीनमध्ये नव्याने सापडले 34 रुग्ण

बीजिंग – चीनमध्ये नव्याने 34 करोना रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 22 रुग्ण बीजिंगमध्ये सापडले आहेत. या रुग्णांच्या रक्तांच्या नमुन्यांमधील जनुकीय श्रेणीक्रम (जिनोम सिक्वेन्स) चीनने जागतिक आरोग्य संघटनेकडे सुपूर्त केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. नव्याने सापडलेल्या 34 करोना विषाणू बाधित रुग्णांमध्ये 7 जण लक्षणे नसलेले संक्रमण झालेल्यांचाही समावेश आहे.
त्याशिवाय बीजिंग आणि हुबेई प्रांतात 22 जणांना देशांतर्गतच संक्रमण झाले आहे. लक्षणे न दिसणाऱ्या 108 प्रकरणांपैकी 57 जण परदेशातील आहेत. हे सर्व जण सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत, असे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे.
फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत बीजिंगमध्ये देशांतर्गत बाधा झालेले 625 रुग्ण सापडले होते. त्यात 411 जणांना उपचारानंतर बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले आहे. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही लक्षणे न दिसणारे 17 जण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. चीनमध्ये करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 83 हजार 352 इतकी झाली आहे आणि करोनामुळे 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे, असे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे.





