बीजिंग : जपानच्या पंतप्रधान सनाइ ताकाइची यांनी केलेले तैवानबद्दलचे वक्तव्य मागे घेतले नाही, तर प्रतिबंधक उपाययोजना कराव्या लागतील, असा इशारा चीनने बुधवारी दिला. ताकाइची यांच्या वक्तव्यावरून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये काल बीजिंगमध्ये चर्चा झाली. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघू न शकल्यानंतर चीनने हा इशारा दिला आहे. ताकाइची यांनी अलिकडेच तैवानबद्दल केलेली टिप्पणी ही चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये घोर हस्तक्षेप आहे. त्यांनी , आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले, युद्धपश्चात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आव्हान दिले आणि चिनी लोकांचा रोष वाढवला असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी माध्यमांना सांगितले. जपानने आपली चुकीची टिप्पणी मागे घ्यावी आणि समस्या वाढवू नयेत. द्विपक्षीय संबंधांचा पाया जपण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले. जर जपानने असे केले नाही, तर चीनला गंभीर प्रतिबंधक उपाययोजना कराव्या लागतील आणि त्याच्या सर्व परिणामांना जपान जबाबदार असेल, असेही त्यांनी सांगितले. तैवानला चीनचा धोका आहे. जर चीनने तैवानवर हल्ला केल्यास तो जपानसाठीही धोका असेल. तैवानचे रक्षण करण्यासाठी जपानचे लष्कर पुढाकार घेईल, असे जपानच्या संसदीय समितीपुढे बोलताना ताकाइची म्हणाल्या होत्या. जपानला सुरक्षा परिषदेत स्थान नाही… संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वाची मागणी करण्यासाठी जपान अगदी अपात्र आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा अबाधित राखण्याची जबाबदारी जो देश स्वीकारू शकत नाही, तो देश सुरक्षा परिषदेचा सदस्य बनण्यासअपात्र आहे, असेही निंग यांनी सांगितले. भारत, जर्मनी आणि ब्राझीलसह जपान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी दावा करत आहे, याला चीनचा विरोध आहे.