तिबेटमधील माउंट एव्हरेस्टचा परिसर चीनकडून पुन्हा खुला

हीजिंग – तिबेट स्वायत्त प्रदेशातील माऊंट एव्हरेस्टचा परिसर चीनने आज पुन्हा खुला केला. माऊंट ऊमोलांग्मा या नावाने प्रसिद्ध असलेल्या या प्रदेशातील गिर्यारोहकांचा प्रवेश जानेवारीत झालेल्या भूकंपानंतर थांबवण्यात आला होता. या भागातल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला ७ जानेवारीला ६.८ रिश्टरच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते.
या भूकंपामध्ये १२६ जणांचा मृत्यू झाला होता आणि १८८ जण जखमी झाले होते. पर्यटक आणि गिर्यारोहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर त्याच दिवसापासून बंद करण्यात आला होता.
तिबेटी भाषेमध्ये माऊंट एव्हरेस्टला माऊंट ऊमोलांग्मा असे म्हटले जाते. हा भाग चीन आणि नेपाळच्या सीमाभागांचा मिळून आहे. चीन आणि नेपाळ दोन्ही देशांनी मिळून १९६१ मध्ये आपला सीमावाद सामोपचाराने मिटवला होता. यानुसार माऊंट एव्हरेस्टच्या शिखरातून दोन्ही देशांची सीमा आखण्यात आली.
भूकंपामुळे माऊंट एव्हरेस्टला कोणताही धोका निर्माण झाला नव्हता. हिमकडे कोसळण्याच्या कोणत्याही घटना किंवा भूगर्भीय हालचाली देखील येथे झाल्याचे निदर्शनास आले नव्हते.
त्यामुळे हा भाग सुरक्षित आहे. स्थानिक सरकारने स्थापन केलेल्या संयुक्त तपास गटाने ३५ दिवसांच्या तपासणीनंतर २२ जानेवारीला हा परिसर पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेतला असल्याचे असे माऊंट ऊमोलांग्मा वातावरण आणि पर्यावरण सर्वसमावेशक निरीक्षक आणि संशोधन स्टेशनचे संचालक मा वेकियांग यांनी म्हटले आहे.





