काश्मीर मुद्द्यावर चीनचा पाकिस्तानला पुन्हा पाठिंबा

बीजिंग – काश्मीरच्या मुद्द्यावरून चीनने पुन्हा एकदा पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढवणाऱ्या काश्मीरबाबतच्या कोणत्याही एकतर्फी कृतीला आपला विरोध असेल, असे चीनने म्हटले आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी चीनच्या दौऱ्यावर असून त्यांनी शनिवारी चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी यांच्याशी चर्चा केली. यावेळी काश्मीरच्या मुद्द्यासह चिनी प्रकल्पावर झालेला बॉम्बस्फोट आणि चिनी इंजिनिअरची झालेली हत्या तसेच चिनी प्रकल्पांच्या सुरक्षेविषयी चर्चा केली गेली.
जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थित खालावत चालली असल्याचा कुरेशी यांनी यी यांना यावेळी सांगितले. कुरेशी आणि यी यांच्यातील चर्चेनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली.
काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान दरम्यान दीर्घ काळापासून वाद आहे. हा वाद शांततापूर्ण मार्गाने आणि संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार, सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि द्विपक्षीय करारांद्वारे सोडवण्यात यावा, असे चीनने पुन्हा एकदा जोर देऊन म्हटले आहे.
परिस्थिती अधिक बिघडवणारी काश्मीरबाबतच्या कोणत्याही एकतर्फी कृतीला चीनचा विरध असेल, असेही या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानची प्रादेशिक अखंडता, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणास ठाम पाठिंब्याचा पुनरुच्चारही चीनने केला.
जम्मू आणि काश्मीरचे विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यास चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी विरोध केला होता. मात्र भारताने या दोन्ही देशांतडून जम्मू काश्मीरबाबत हस्तक्षेप अमान्य केला आहे आणि जम्मू काश्मीर निसंदिग्धपणे भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले आहे..





