ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला प्रत्युत्तर देत चीनने उचलले मोठे पाऊल, घेतला ‘हा’ निर्णय

USA China Trade War | अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ धोरणामुळे गेल्याकाही दिवसांपासून तणाव वाढला आहे. यातच आता चीनने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगकडून विमानांची नवीन खरेदी थांबवण्याचे निर्देश चीन सरकारने आपल्या कंपन्यांना दिले आहेत.
अमेरिकेतून विमानांसाठी लागणारी उपकरणे व सुटे भागही न खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.
ट्रम्प प्रशासनाने चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर तब्बल 145 टक्क्यांपर्यंत कर लावल्याने चीनकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
करांमुळे विमानांची किंमत दुप्पट
प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकन उत्पादनांवर 125 टक्के कर लावण्याची घोषणा केली. परिणामी, अमेरिकेतून आयात होणाऱ्या विमानांचे व त्याच्या सुट्या भागांचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे चिनी विमान कंपन्यांना बोईंगकडून विमाने खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या अवघड झाले आहे.
रिपोर्टनुसार, चीन सरकार सध्या अशा विमान कंपन्यांना मदत करण्याचा मार्ग शोधत आहे, ज्या कंपन्यांनी बोईंगकडून विमाने भाड्याने घेतली आहेत व आता वाढीव खर्चाचा सामना करत आहेत.
ही परिस्थिती बोईंगसाठी अत्यंत चिंताजनक ठरत आहे. 2018 मध्ये बोईंगच्या एकूण विक्रीपैकी 25 टक्के विमाने चीनला पाठवण्यात आली होती.
तसेच, पुढील 20 वर्षांत जागतिक विमानांच्या मागणीत चीनचा हिस्सा 20 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, अलीकडच्या काळात कंपनीच्या गुणवत्तेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. अमेरिका-चीन व्यावसायिक संघर्षामुळे चीनने बोईंगला कोणतीही मोठी ऑर्डर दिलेली नाही.
चीनकडून बोइंगऐवजी युरोपियन कंपनी एअरबस एसईकडून विमान खरेदी करण्यास प्राधान्य देत आहे.





