China Open 2024 : अल्काराजनं गाठली अंतिम फेरी, विजेतेपदासाठी समोर असणार सिन्नरचे आव्हान…

China Open 2024 : जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्काराझने मंगळवारी बीजिंग येथे रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा 7-5, 6-3 असा (Carlos Alcaraz beat Daniil Medvedev) सरळ सेटमध्ये पराभव करून चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
चार वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन अल्काराझने उपांत्य फेरीत 88 मिनिटांत विजय मिळवला. यासह मेदवेदेवविरुद्ध विजय-पराजयाचे रेकाॅर्ड 6-2 असे केले. अल्काराजसमोर आता अंतिम फेरीत गतविजेता आणि अव्वल मानांकित खेळाडू यानिक सिन्नरचे आव्हान असेल. विजेतेपदाची लढत ही बुधवारी(2 आॅक्टोबर) दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. दुसऱ्या उपांत्य फेरीत यानिक सिन्नर याने वाईल्ड कार्डधारक चीनचा बु युनचाओकेट 6-3, 7-6(3) असा (Jannik Sinner defeated Yunchaokete Bu) पराभव केला.
दरम्यान, कार्लोस अल्काराझने सोमवारी बीजिंगमध्ये कॅरेन खाचानोव्हविरुद्ध सरळ सेटमध्ये विजय मिळवत सलग दुसऱ्या वर्षी चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. स्पेनच्या 21 वर्षीय अल्काराझने जागतिक क्रमवारीत 27व्या स्थानावर असलेल्या खाचानोव्हला 7-5, 6-2 असे पराभूत केले होते.
China Open 2024 : सबलेन्का-ओसाकाची आगेकूच कायम तर जेसिका पेगूलाला पराभवाचा धक्का…
दुसरीकडे जगातील नंबर वन खेळाडू यानिक सिन्नरने सोमवारी जिरी लेहकाचा सरळ सेटमध्ये पराभव करून चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. सिन्नर याने 37व्या मानांकित लेहेकाविरुद्ध 6-2, 7-6 असा विजय नोंदवला होता.





