China Masters 2024 : पी.व्ही. सिंधूचे चायना मास्टर्समधील आव्हान संपुष्टात…

BWF China Masters 2024 (Shenzhen, China) : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू गुरुवारी चीन मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सिंगापूरच्या यिओ जिया मिननकडून पराभूत झाली. यासह तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूने सामन्याची सुरुवात चांगली केली पण सिंगापूरच्या ‘यिओ’ने चांगले पुनरागमन करत सामना जिंकला. सिंधूने पहिला गेम जिंकला पण तिला आपली लय कायम राखता आला नाही आणि तिला यिओकडून 16-21, 21-17, 21-23 असा पराभव पत्करावा लागला.
तत्पूर्वी, बुधवारी महिला गटात सिंधूने 50 मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत तिच्यापेक्षा उच्च मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा 21-17, 21-19 असा पराभव केला होता. जागतिक क्रमवारीत 19व्या स्थानी असलेल्या सिंधूचा जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या बुसाननविरुद्धच्या 21 व्या सामन्यातील हा 20वा विजय होता.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या कुमामोटो मास्टर्स जपान सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेतही पीव्ही सिंधूला प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्कारावा लागला होता. कॅनडाच्या मिशेल लीने तिला 17 – 21, 21 – 16, 21 – 17 असं पराभूत केले होते.





