पाक इतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू; निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे मत

पुणे – प्रतिनिधी – भारत आणि पाकिस्तानमधील युद्धसंघर्षात चीनने पाकला छुपी मदत केली असून, जवळपास 20 अब्ज डॉलरहून अधिक किमतीची शस्त्रास्त्रे पाकला पुरवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनही पाकइतकाच आपला मोठा शत्रू आहे. आपल्या जवानांचे रक्त सांडण्यास चीनही तितकाच जबाबदार असून, भविष्यात ड्रॅगनलाही धडा शिकवायला हवा, असे स्पष्ट मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी येथे व्यक्त केले.
‘लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप सोसायटी’च्या वतीने ‘ऑपरेशन सिंदुर’अंतर्गत भारताने पाकिस्तानला कसा धडा शिकवला?’ या विषयावर नवी पेठ स्थित एस. एम. जोशी हॉलमध्ये ब्रिगेडियर महाजन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमान्य’चे संस्थापक-अध्यक्ष व तरुण भारतचे समूह संपादक किरण ठाकुर होते.
ब्रिगेडियर महानज म्हणाले, की, युद्धभूमीवर चीनचे बारीक लक्ष होते. भारत व पाक यांच्यातील युद्धसंघर्षात चीनने पाकला मोठी मदत केली. वीस अब्ज डॉलरचा शस्त्रसाठा दिला. तंत्रज्ञान पुरवले. याशिवाय विमानांच्या ट्र्रॅकिंगसाठीही पाकला त्यांची मदत केल्याचे दिसते. त्यामुळे भारतीय जवानांचे रक्त सांडण्याकरिता चीन देखील तितकाच कारणीभूत आहे, असे म्हणता येईल.
चीनला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सर्वप्रथम आपण चीनवर आर्थिक बहिष्कार घालायला हवा. आपले व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर चीनी उत्पादांनांवर अवलंबून असलेले दिसते. हा आर्थिक चक्रव्यूह भेदला गेला पाहिजे. त्याकरिता चीनी उत्पादनांना प्रतिबंध करायला हवा. चीनी उत्पादने ओळखून त्याऐवजी स्वदेशी अथवा अन्य कंपन्यांचा माल आपण घेतला पाहिजे.
पाकिस्तानबाबत बोलताना ब्रिगेडियर महाजन म्हणाले की, भारताविरुद्धच्या तिन्ही युद्धात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. आपण भारताविरोधात जिंकू शकत नाही, याची जाणीव झाल्यानेच ते छुप्या युद्धाचा कुबड्या वापरतात. दहशतवादी हल्ले किंवा ड्रोन युद्ध हा त्यातलाच प्रकार. जगाचे लक्ष वेधण्यासाठी पहलगामवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. मागील काही दिवसांपासून या भागात शांतता होती. दहशतवाद्यांच्या कंबरडे जवळपास मोडल्यात जमा होते. रस्ते, बोगदे व अन्य सुविधा मोठय़ा प्रमाणात वाढल्याने पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली होती. त्यात अमेरिकेचे उपाध्यक्षही भारत भेटीवर होते. ही वेळ पाकने साधली. मात्र, भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
…तर चार दिवसांपर्यंतच पाक लढू शकला असता
वॉटर वॉर हा यामधला महत्त्वाचा मुद्दा ठरतो. भारताने पाकिस्तानला जाणारे पाणी रोखल्याने सिंधू खोऱ्यात पाकची कोंडी झाली. पाकवर आर्थिक निर्बंध लादण्यात आल्याने व्यापार ठप्प झाला. अटारीतून पाच ते सहा हजार कोटी रुपयांचा व्यापार होतो. तो थांबवण्यात आल्याचा पाकला जादा दराने अन्य देशांतून माल घेणे भाग पडले. त्यामुळे तेथील महागाईत आणखी तेल ओतले गेले. मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करावे लागल्याने तोही भार या कर्जबाजारी देशावर पडला. भारताने युद्धसंघर्ष सुरू केल्यानंतर पुढचे केवळ चार दिवस लढाई करता येईल, एवढची पाकची तयारी होती. चीनने मदत मिळणे शक्य असले, तरी निधीचा प्रश्न होता, असेही त्यांनी सांगितले.
पाकच्या सैन्यदलाचे मनोबल तुटलेय
सध्या पाकिस्तानच्या सैन्याचे मनोबल पूर्णपणे तुटले आहे. बलुचिस्तानमधील बंडखोरांच्या बंडाला त्यांना मोठय़ा प्रमाणात सामारे जावे लागत आहे. खैबर पख्तुनख्वामधील वातावरणही पाकविरोधी असून, अफगाणिस्तानसोबत पाकचा संघर्ष सुरू आहे. अंतर्गत वाद व देशाची कोसळलेली अर्थव्यवस्था यामुळे सध्या पाक जेरीस आला आहे. पाकमधील ही परिस्थिती भारतासाठी संधी असल्याचे मत त्यांनी नोंदवले.
युरोपातून भारताला मदतीची संधी
या युद्धात भारताला इस्रायलसारख्या देशाची चांगली मदत झाली. फ्रान्सनेही आपल्याला राफेलसाठी मदत केली आहे. अन्य युरोपियन राष्ट्रांकडूनही आपल्याला आगामी काळात मदत मिळू शकते, अशी आशाही महाजन यांनी व्यक्त केली.
पुणे, बेळगाव ही जागरूक शहरे : किरण ठाकुर
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर म्हणाले, राष्ट्रप्रेम तरुण पिढीत जागृत व्हावे म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. बांगलादेश निर्मितीनंतर पाकिस्तानने शीत युद्ध केले. भारतावर जखमा करणे सुरू ठेवले. बेळगावमध्ये मराठा इन्फंट्री आहे. पुण्यातसुद्धा सैन्यदलाशी निगडित अनेक संस्था आहेत. ही शहरे राजकीय, सैन्याच्या तसेच राष्ट्रप्रेमाच्या दृष्टीने जागृत शहरे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.





