बीजिंग : चीनकडून पाकिस्तानला दुसरी अत्याधुनिक पाणबुडी हस्तांतरित करण्यात आली आहे. चीनकडून पाकला हँगर श्रेणीतल्या ८ पाणबुड्या देण्यात येणार आहेत. त्या मालिकेतील ही दुसरी पाणबुडी आहे. या पाणबुड्यांसाठी पाकिस्तानने चीनबरोबर ५ अब्ज डॉलरचा करार केला आहे. आज चीनच्या हुबेई प्रांतातल्या वुहान येथे यातल्या दुसऱ्या पाणबुडीला पाकिस्तानकडे सोपवण्यात आले.
ही पाणबुडी गेल्या काही वर्षांत चीनने पाकिस्तानला पुरवलेल्या चार आधुनिक नौदल युद्धनौकांच्या व्यतिरिक्त आहे. एकूण ८ पाणबुड्यांमधील ४ पाणबुड्या चीनमध्ये तर उर्वरित ४ पाणबुड्यांची निर्मिती पाकमधीलकराची येथे केली जाणार आहे. या नवीन पाणबुडीमध्ये पाकिस्तानी नौदलाचा मुख्य आधार बनण्यासाठी एक मजबूत व्यापक लढाऊ क्षमता आहे.
या पाणबुडीच्या क्षमतेमध्ये टॉर्पेडो, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि माइन-लेइंग क्षमता, तसेच पाण्याखालील शोध घेऊ शकणाऱ्या प्रगत प्रणालींचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत चीनने पाकिस्तानच्या ८१ टक्के प्रगत लष्करी यंत्रणेचा पुरवठा केला आहे, त्यामुळे पाकिस्तान चीनचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार बनला आहे.