China Corona: कोविड रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे चीनमधील पर्यटनस्थळे बंद

बीजिंग – चीनचा उत्तर-पश्चिम भाग हा पर्यटनासाठीचा महत्त्वाचा भाग आहे. पण त्या भागात पुन्हा कोविडचे काही रुग्ण आढळून आल्याने तेथील सर्व पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. या पर्यटनासाठी प्रख्यात असलेल्या प्रांताचे नाव गांसू असे आहे. तेथेच पुराणकालीन सिल्क रोड आहे आणि बुद्धांशी संबंधित काही ठिकाणे आणि अन्य धार्मिक स्थळेही आहेत.
नॅशनल हेल्थ मिशनने म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत स्थानिक ट्रान्समिशन झालेल्या 35 नवीन कोविड केसेस तिकडे सापडल्या आहेत. मंगोलियाच्या अंतर्गत भागात 19 केसेस सापडल्या असून तेथील सर्व लोकांना घरातच थांबण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.
चीनमध्ये जिथे कोठे कोविडच्या थोड्या जरी केसेस आढळून आल्या तर चीनमधील स्थानिक प्रशासन त्या विषयी नो टॉलरन्सची भूमिका घेते आणि कडक उपाययोजना करते. त्यामुळे प्रवाशांना आता तेथे पुन्हा कोविड टेस्ट सर्टिफिकेटचाही आग्रह धरला जाऊ लागला आहे.





