China-Canada : चीन-कॅनडाची व्यापार जवळीक; संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने उचलले पाऊल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची व्यापार चर्चा उत्तर अमेरिकेतील एकात्मिक वाहन उद्योग टिकवण्यात अपयशी ठरल्यास कॅनडा चिनी वाहन निर्मात्यांकडे वळू शकतो.

China-Canada – अमेरिकेशी असलेले संबंध ताणले जात असतानाच कॅनडा आणि चीनने परस्पर व्यापार संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. मंगळवारी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी आयात शुल्कात अतिरिक्त कपात करण्यावर सहमती दर्शवली.
आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य (एपेक) शिखर परिषदेपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी यंदा स्वीकारलेल्या धोरणात्मक भागीदारीचे कौतुक करत आर्थिक संबंधांतील सुधारणांवर भर दिला.
नव्या निर्णयानुसार, पूर्वी झालेल्या कराराची व्याप्ती आणि मुदत वाढवण्यात आली असल्याचे पंतप्रधान कार्नी यांच्या कार्यालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. या करारान्वये चीन कॅनडाच्या सुमारे ४०० दशलक्ष कॅनेडियन डॉलर (२८० दशलक्ष अमेरिकी डॉलर) किमतीच्या निर्यातीवर अतिरिक्त आयात शुल्क सवलत देणार आहे.
यामध्ये गोठवलेले डुकराचे मांस, मासे आणि सागरी खाद्यपदार्थांचा समावेश आहे. त्याबदल्यात, कॅनडाने चीनच्या काही निवडक पोलाद आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवरील शुल्क सवलतीला दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे.
विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची व्यापार चर्चा उत्तर अमेरिकेतील एकात्मिक वाहन उद्योग टिकवण्यात अपयशी ठरल्यास कॅनडा चिनी वाहन निर्मात्यांकडे वळू शकतो, असे सूचक विधान कार्नी यांनी या भेटीच्या एक दिवस आधीच केले होते.
दरम्यान, जानेवारी महिन्यातही जिनपिंग आणि कार्नी यांच्यात करार झाला होता. त्याअंतर्गत कॅनडाने चिनी विद्युत वाहनांवरील १०० टक्के आयात शुल्क कमी करून ६.१ टक्क्यांवर आणले होते आणि सुरुवातीला वार्षिक ४९,००० वाहनांना सवलतीच्या दरात प्रवेश देण्यास मान्यता दिली होती.
ज्याची मर्यादा टप्प्याटप्प्याने वाढवण्याचे ठरले आहे. या बदल्यात चीनने कॅनोलासह कॅनडाच्या कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्यास सहमती दर्शवली होती.






