आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या मदतीला धावला चीन; 700 दशलक्ष डॉलरचे दिले कर्ज

इस्लामाबाद – चीनने पाकिस्तानला 700 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दर यांनी ही माहिती दिली आहे. “बोर्ड ऑफ चायना डेव्हलपमेंट बॅंकेने या कर्जाच्या प्रस्तावाला मंजूरी दिल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केलेल्या मागण्यांनुसार करांद्वारे मिळणाऱ्या महसूलात वाढ करण्यासाठी एक अर्थ विधेयक पाकिस्तानच्या संसदेमध्ये कालच एकमताने मंजूर करण्यात आले आहे. नाणेनिधीकडून 1.1 अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी हे अर्थविधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवसी चीनच्या बॅंकेकडूनही कर्ज मंजूर झाल्याचे दर यांनी सांगितले.
या कर्ज मंजूरीची औपचारिक प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. कर्जाची ही रक्कम येत्या आठवड्याभरात पाकिस्तानला मिळणे अपेक्षित आहे. यामुळे पाकिस्तानच्या विदेशी गंगाजळीमध्ये भरच पडणार आहे, असेही दर यांनी सांगितले. पंतप्रदान शेहबाझ शरीफ यांच्या सरकारने कठोर काटकसरीच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. करांचे प्रमाण वाढवण्यात आले असून खर्चांना मोठ्या प्रमाणात कात्री लावण्यात आली आहे.





