पिंपरी | आठवडे बाजारात मिरचीचा तोरा ; टोमॅटोचा रुबाब मावळला

कामशेत, (वार्ताहर) – सध्या बाजारात मिरचीचे दर वाढल्याने मिरचीचा वेगळाच तोरा पाहायला मिळत आहे. पालेभाज्यांचे दर कमी झालेले असताना, हिरव्या मिरचीचा ठसका मात्र कायम आहे.
दुसरीकडे उन्हाळ्याच्या हंगामात रुबाबात असणाऱ्या लिंबाचा रुबाब आवक वाढल्याने मावळला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी होती.
पण ती आता कमी झाली आहे. श्रावण महिना चालू झाल्याने पालेभाज्यांची मागणी मोठी वाढली आहे, असे असले तरीही आवक व्यवस्थित सुरू असल्याने पालेभाज्यांचे भाव स्थिर आहे.
लिंबू ४० रुपये किलो –
मागील तीन महिन्यात लिंबाच्या दराने उच्चांक गाठला होता. मार्च महिन्यापासूनच लिंबाचे भाव वाढले होते. दहा ते पंधरा रुपये नगाप्रमाणे लिंबू विकला गेला. परंतु जून महिन्याच्या सुरुवातीपासून लिंबाची आवक वाढली. त्यामुळे उन्हाळ्यात ४०० ते ४५० रुपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या लिंबाचा भाव ३० ते ४० रुपये किलोवर आला आहे.
आवक कमी असल्याने बटाटा स्थिर –
एकीकडे मिरचीचे भाव वाढत असताना बटाट्याची आवक कमी होऊनसुद्धा बटाट्याचे दर स्थिर आहेत. मागील काही महिन्यांपासून बटाटा प्रति किलो २५ ते ३० रुपये दराने विक्री होत आहे. आताही बटाट्याचा हाच दर कायम आहे.
कांदा १५ रुपयांवर –
बाजारात कांद्याची मोठी आवक होत आहे. आवक वाढली असली तरी मालाला हवा तसा उठाव मिळत नाही. बाजारात ग्राहक नसल्याने बराच माल पडून राहतो आहे.
त्यामुळे कांद्याचे दरही उतरले आहेत. महिन्याच्या सुरुवातीला घाऊक बाजारात कांद्याचे दर २० ते २५ रुपये किलोपर्यंत होते. तर किरकोळमध्ये ते ३० ते ३५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र आता घाऊक बाजारात कांदा निचांकी दरावर आल्याने किरकोळ बाजारात कांदा १५ ते २० रुपये किलोच्या घरात आहे.
हिरवी मिरची ८० ते १०० रुपये किलो
सध्या भाजी मंडईत केवळ हिरव्या मिरचीचाच ठसका आहे. कांदा, बटाटा, लसूण या सर्वांचे दर नियंत्रणात आहेत. मात्र, मिरचीने शंभरी गाठली आहे.
घटत्या उत्पादनाबरोबर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीचा परिणाम भाजीपाल्यांच्या दरावर झालेला आहे. उन्हाळी हंगामात मिरचीचे उत्पादन मर्यादीत क्षेत्रावर घेतले होते. तर इतर राज्यातून मिरचीची होणारी आवक कमी झाल्याने हिरव्या मिरचीच्या दरात वाढ होत आहे.
सध्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने. त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. हिरव्या पालेभाज्यांची आवक चांगली होत आहे.
त्यामुळे भाज्यांचे दरही कमी होऊ लागले आहेत. सोबत रानभाज्या देखील बाजारात येऊ लागल्या कोथिंबिर आणि मेथीच्या दरात दुप्पट झाली आहे. काही दिवसांपासून मेथीसह अन्य पालेभाज्याची आवक चांगली आहे. त्यामुळे मेथी ३० रुपये, कोथिंबिर ४० रुपये, पालक २० रुपये प्रति गड्डी झाली आहे.





