सुरक्षा परिषदेतील भारताच्या सदस्यत्वाला चिलीच्या अध्यक्षांनी दिला पाठिंबा

नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेले चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व मिळण्याच्या भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. बहुपक्षीयता ही जगाची गुरुकिल्ली आणि भविष्याचा मार्ग आहे, या मुद्यावर फॉन्ट यांनी आज विशेष भर दिला. चिली आणि भारत – ग्लोबल साउथमध्ये शेजारी शेजारी – या विषयावर ५३ व्या सप्रू हाऊस व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
चिली भारतासोबत आपली भागीदारी वाढवू इच्छितो कारण द्विपक्षीय सहकार्याला दोन्ही देशांना मोठी संधी आहे. चिलीच्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताला प्राधान्य आहे. चिलीच्या विकासासाठी तंत्रज्ञानातील भारताचे नेतृत्व प्रासंगिक आहे. चिलीने नेहमीच संयुक्त राष्ट्रात सुधारणांचे आवाहन केले आहे आणि सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दर्शविला आहे, असे अध्यक्ष फॉन्ट म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील कोणत्याही नेत्याशी संवाद साधू शकतात. ते ट्रम्प, झेलेन्स्की, पुतीन युरोपीय संघ आणि लॅटिन अमेरिकेतल्या ग्रीस किंवा इराणमधील नेत्यांशीही संवाद साधू शकतात. हे इतर कोणत्याही नेत्याला शक्य नाही. सध्याच्या काळात पंतप्रधान मोदी हे महत्वाचे भूराजकीय नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार देखील चिलीच्या अध्यक्षांनी काढले.
राजनैतिक संबंधांना 76 वर्षे पुर्ण
चिलीचे अध्यक्ष बोरिक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारत आणि चिली दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना यंदा ७६ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त ते भारतभेटीवर आहेत. अध्यक्ष बोरिक यांच्यासोबत परराष्ट्र व्यवहार, कृषी, खाणकाम, महिला आणि लिंगभाव समानता आणि संस्कृती, कला आणि वारसा मंत्री, संसद सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने उद्योजक देखील आले आहेत. नवी दिल्ली व्यतिरिक्त, अध्यक्ष बोरिक हे आग्रा, मुंबई आणि बंगळुरूला भेट देतील.





