स्वीडनमध्ये लहान मुलांना मोबाईल वापरण्यावर बंदी

स्टॉकहोम : स्वीडनमध्ये मुलांच्या फोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांमध्ये फोनच्या अतिवापरामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या समोर आल्यानंतर स्वीडिश सरकार सतर्क झाले आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशात 2 वर्षांखालील मुलांच्या ‘स्क्रीन’ वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानंतर सरकारने जारी केलेल्या ॲडव्हायझरीमध्ये मुलांना टीव्ही आणि मोबाईल फोनसह कोणतीही ‘स्क्रीन’ वापरण्याची परवानगी देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारकडून सांगण्यात आले आहे की, 2 ते 5 वर्षे वयोगटातील मुले दिवसातून जास्तीत जास्त 1 तास स्क्रीन वापरू शकतात, तर 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुले 2 तास स्क्रीन वापरू शकतात. किशोरांना दिवसातून जास्तीत जास्त 3 तास स्क्रीन वापरण्याची परवानगी असेल. विविध संशोधनातून असे दिसून आले आहे की, ‘स्क्रीन’च्या अतिवापरामुळे मुले आणि किशोरवयीन मुलांच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे स्वीडन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
झोपेवर परिणाम होऊन वाढते नैराश्य –
इतकेच नाही तर झोपेवर परिणाम होण्यासोबतच फोनच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे आणि शारीरिक हालचालींची पातळी सतत कमी होत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. अमेरिका, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्ससारख्या देशांनीही अशा सूचना जारी केल्या आहेत. यापैकी फ्रान्सने तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना स्क्रीन वापरण्यास अजिबात परवानगी देऊ नये असा कडक सल्ला दिला आहे.





