पिंपरी | शिक्षणासाठी चिमुकल्यांना रोज करावे लागत धाडस

इंद्रायणीनगर (वार्ताहर) – भोसरी परिसरात धावडे वस्ती येथे असलेले भैरवनाथ विद्यालयाची ख्याती आहे. शिक्षणाचा दर्जा व कामगार वर्गाला परवडणारी माफक शुल्कामुळे भोसरी सह इतर उपनगरातील विद्यार्थी येथे बहुसंख्येने शिकायला असून या शाळकरी मुलांना शिक्षण घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शाळेत येण्या-जाण्यासाठी रोजच करावी लागणारी रस्ता ओलांडतांनाची कसरत धक्कादायक आहे. जीव मुठीत धरून रस्ता ओलांडणारे विद्यार्थी व महिला रस्ता ओलांडतांनाचे चित्र अंगावर काटा आणणारे आहे.
मात्र हे धाडस केल्याशिवाय शाळेत जाणे शक्य नसल्याने गेले कित्येक वर्षे जिवावर उदार होऊन चिमुकल्यांचा हा जिवघेणा प्रवास विद्यार्थी व पालकांसाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहे.
कामगार व सर्वसामान्यांची वस्ती म्हणून भोसरी परिसरातील धावडे वस्ती, सद्गुरू नगर, लांडगे नगर, चक्रपाणी वसाहत या भागाची ओळख आहे. या कामगार बहुल वर्गातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी या परिसरात अनेक खाजगी संस्था नावारूपाला आल्या आहेत.
परिसरातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. तसेच या रहिवाशी परिसरातील कामगार व नागरिकांना सुद्धा रस्ता ओलांडूनच घर गाठावे लागत आहे. पुणे नाशिक महामार्ग असल्यामुळे व चाकण, भोसरी औद्योगिक परिसर ठराविक अंतरावर असल्यामुळे महामार्गांवर सुसाट वाहनांची गर्दी कायमच असते.
महामार्गांवर असलेल्या दुभाजकांमधून विद्यार्थी वाट काढत रस्ता ओलांडताना सहज दृष्टिक्षेपास पडतात. महामार्गांवर सिग्नल यंत्रणा असलीही तरीही ती लांब अंतरावर पडते.
धावडे वस्तीच्या मधोमध दोन्ही रस्त्यावरून रस्ता ओलांडण्याचे धाडस नागरिकांना करावे लागते. या ठिकाणी रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने झेब्रा क्रॉसिंगची सोय कुठेही दिसत नाही.
सिग्नल यंत्रणा फक्त नावालाच
महामार्गावरील या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. वाहनधारक वाहतुकीचे कुठलेही नियम पाळतांना दिसत नाहीत. लहान मुलांपेक्षा मोठी माणसेच सर्व नियम धाब्यावर बसवितांना दिसतात.
गेल्या सहा महिन्यापासून या चौकातील सिग्नल यंत्रणा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर नियंत्रण राहत नाही. वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी सुध्दा येथे फिरकत नाहीत. रस्त्यावर झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे आखून नामशेष झालेत मात्र रस्त्याची रंगरंगोटी या पलिकडे त्यांचा योग्य वापर होत नाही.
महामार्गांवर सूचना फालकांची गरज
भरधाव वाहणाऱ्या रस्त्यावर शाळेत सोडायला आई किंवा वडील सोबत असूनही भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमधून रस्ता ओलांडून जाण्याची हिंमत होत नाही. वाहनांच्या वेगाला लगाम घालणारे गतीरोधक नाहीत.
जवळ शाळा असल्याचे फलक, किंवा वेगाची मर्यादा ठरविणारे वाहतुकीचे चिन्ह नाही त्यामुळे रस्ता ओलांडतांना लहान मुले वेगात येणाऱ्या वाहनांना हात दाखवित वेगाला आवर घालण्याचे सांगतात. या ठिकाणी वाहतुक पोलीस प्रशासनाचे लक्ष नाही.
विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षित पार करण्यासाठी कुठल्याही उपाययोजना न करता वा-यावर सोडून दिले आहे. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी सोय करावी नाही तर भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना झाल्याशिवाय राहणार नाही.
नाशिक फाटा ते मोशी सेवा रस्ता प्रलंबित
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रं . ५० च्या नाशिक फाटा ते मोशी या १२ कि.मी. सेवा रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने या मार्गालगत असणाऱ्या भोसरीतील सद्गुरुनगर , इंद्रायणीनगर , लांडगेनगर ,
गुरुविहार – पांजरपोळ , जयगणेश साम्राज्य, वखार महामंडळ भागातील नागरिक व वाहनचालक यांना सेवामार्ग नसल्याने महामार्ग ओलांडताना व उलट दिशेला प्रवास करताना महामार्गावरून येणाऱ्या वेगवान वाहनांमुळे रस्ता अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
अनेक वर्षांपासून डी.पी.आर.चे काम पूर्ण नसल्याचे समजते यास मंजुरी देणेकामी व काम सुरु करणे कामी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून या ठिकाणी रस्ता विस्तारीकरण, ग्रेडसेपरेटर,
पादचारी पूल, भुयारी मार्ग करण्याचे काम सुरु करण्यात यावे. याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी प्रशासन दरबारी समस्या मांडली. मात्र नेहमीप्रमाणे प्रशासनाने सुद्धा दुर्लक्ष करीत वाटाण्याच्या अक्षता दिल्याचे म्हटले तर वावगे ठरू नये.





