बगदाद – बालविवाहाचे वाईट प्रकार रोखण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत. यावर काही प्रमाणात नियंत्रण आणले गेले आहे, परंतु अजूनही असे अनेक देश आहेत जे बालविवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी सतत संघर्ष करत आहेत. इराक या देशात अजुनही बालविवाहाला खतपाणी घालण्याचाच प्रकार सुरू आहे.
इराक आता देशातील विवाह कायद्यात बदल करण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत मुलींच्या लग्नाचे वय फक्त 9 वर्षे केले जाणार आहे. जर ही दुरुस्ती इराकमध्ये झाली तर लग्नाचे वयही कमी होईल 1959 मध्ये आणलेल्या कायद्याच्या अंतर्गत घटस्फोट, मुलांचा ताबा आणि मालमत्ता यासारख्या विशेष अधिकारांवरही बंदी घालण्यात आली आहे.
हा कायदा पश्चिम आशियातील सर्वात प्रगतीशील कायद्यांपैकी एक मानला जात होता. शिया पक्षांच्या आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकारने ही दुरुस्ती इस्लामिक शरिया कायद्यांतर्गत केली आहे आणि इराक सरकारचे म्हणणे आहे इराकी महिला गटाच्या सततच्या विरोधाला न जुमानता हा कायदा मंजूर करायचा आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, इराकमध्ये बालविवाह खूप प्रचलित आहे आणि सुमारे 28 टक्के मुलींचे लग्न हे त्यांचे वय 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच केले जाते.
दरम्यान, या कायदा दुरूस्तीमुळे तरुण मुलींना लैंगिक आणि शारीरिक हिंसाचाराचा धोका वाढवेल आणि त्यांना शिक्षण आणि रोजगारापासून वंचित ठेवले जाईल असे ह्युमन राइटस् वॉचने म्हटले आहे.