मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची लातूर मनपा ‘उपायुक्त‘ पदी पदोन्नती; माधव खांडेकर आळंदीचे नवे मुख्याधिकारी

आळंदी – आळंदी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची पदोन्नतीने आळंदी येथून बदली झाली असून त्यांची लातूर महानगरपालिका ‘उपायुक्त‘ पदी नियुक्ती झाली आहे. तर नातेपुते (जि. सोलापूर) नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची आळंदी नगरपरिषद पदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी (दि. 20) ते पदभार स्वीकारतील.
आळंदी नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी म्हणून कैलास केंद्रे यांनी केलेल्या कामांमुळे आळंदी शहराच्या वैभवात मोठी भर पडली आहे. त्यांच्या 2 वर्षांच्या काळात त्यांनी शाळांचे दर्जावर्धन, इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपी प्रकल्पाची सुरुवात, आकर्षक बाल उद्यानाची निर्मिती, नगरपरिषद उत्पन्न वाढीसाठी शॉपिंग सेंटर बांधकाम, 4 वाऱ्यांचे उत्कृष्ट नियोजन, शिवसृष्टी, तुळशी वृंदावन, माऊली- चांगदेव भेट, सिद्धबेट परिसर विकास अश्या अनेक सर्वच क्षेत्रातील दर्जेदार कामामुळे आपली वेगळी छाप पाडली. मात्र आळंदीच्या नियमित पाणी पुरवठ्याची समस्या कायम असून नवनियुक्त मुख्याधिकारी खांडेकर आळंदीकरांना नियमित पाणीपुरवठ्याचे आव्हान कसे पेलणार हे पाहणे महत्वाचे आहे.
कैलास केंद्रे यांच्या 2 वर्षांच्या कार्यकाळात झालेली उल्लेखनीय कामे:
– इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा व अनेक वर्ष रखडलेला एसटीपी प्रकल्पाचे काम प्रगती पथावर.
– शाळा क्रमांक ४ च्या २ मजली इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर.
– शाळा क्रमांक १ चे सुंदर नुतनीकरण, शाळा क्रमांक २ येथे सीएसआर निधीतून ६ कॉम्प्युटर्स उपलब्ध करून घेवून सुरू करण्यात आलेला संगणक कक्ष, शाळा क्रमांक ३ येथे टॉयलेट ब्लॉक बांधून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली.
– आळंदी नगरपरिषदेच्या शाळांसाठी २१ अतिरिक्त शिक्षकांची पदे मंजूर.
– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर आकर्षक शिवसृष्टी उभारली.
– नेहमी कचऱ्याचे ढीग व ओंगळवाणे फ्लेक्स यांनी व्यापून असलेल्या चाकण चौक येथे मनमोहक अशा तुळशी वृंदावनची उभारणी.
– भैरवनाथ चौक येथील माऊली-चांगदेव यांच्या भेटीवर आधारित शिल्पाची उभारणी.
– आळंदी नगरपरिषद शॉपिंग सेंटरचे बांधकाम अंतिम टप्प्यात.
– प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पीएमपीएल बस स्टॉप येथे पुरुष व स्त्रिया यांच्यासाठी सुसज्ज टॉयलेट ब्लॉकचे बांधकाम प्रगती पथावर.
– बालगोपाल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हक्काचं व्यासपीठ ठरलेल्या आळंदीतील एकमेव व आकर्षक अश्या “हरिपाठ बाल उद्यान” निर्मिती.
– नमामी चंद्रभागा अभियानातून इंद्रायणी नदी घाटाच्या कामाची सुरुवात.
– आळंदी नगरपरिषद टाऊन हॉल चे नुतनीकरण व स्वागत कमानीची उभारणी.
– तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात ३% निधीची तरतूद.
– शहरातील सर्व दिव्यांग बांधवांचा प्रत्येकी 4 लाखांचा विमा काढला.
– माऊलींच्या वास्तव्याने पावन झालेल्या ‘सिद्धबेट‘ परिसरात वृक्षारोपण, विद्युत प्रकाशाची व्यवस्था आदी माध्यमातून सकारात्मक बदल केला.





