मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभागाने यासंदर्भातील माहिती दिल्याचे समोर येत आहे. आत्मघातकी स्फोट घडवून मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा आणि पोलिस प्रशासन सतर्क झाले असून अधिक तपास सुरू आहे.
याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री म्हणाले, माझ्यावर धमक्यांचा परिणाम होत नाही. असे अनेकवेळा फोन आले. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री फडणवीस सक्षम आहेत. धमकी आली पण त्यांनी धाडस करू नये. पोलीस, गृहविभाग योग्य ती खबरदारी घेत आहेत. नक्षलवाद्यांकडून याआधीही धमकीचे फोन आले होते, असे शिंदे यांनी म्हंटले आहे.”
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिस यंत्रणा सतर्क
याप्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्ववादी सरकार ज्या दिवसापासून राज्यात आलं आहे तेव्हापासून अनेकांच्या पोटात दुखत असून त्या लोकांना अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. पण अशा प्रकारची प्रवृत्ती आता ठेचून काढली जाईल. याच्या मुळाशी कोण आहे याचा तपास केला जाईल.” दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पीएफआय संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्या घटनेचा या धमकीशी काही संबंध आहे का त्या दृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत. तसेच महिनाभरापूर्वी शिंदेंना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात आले होते. तसेच धमकीचा एक निनावी फोनही आला होता. या आधी नक्षलवाद्यांकडूनही शिंदेंना धमकी आली होती.