Nagar : अजूनही लाडक्या भावाची ससेहोलपट

अहिल्यानगर : लाडक्या बहिणीबरोबरच लाडक्या भावांसाठी राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जिल्ह्यात बोर्या वाजला आहे. सहा महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणुन नियुक्ती करण्यात आली, मात्र गेल्या चार महिन्यांपासून मानधनासाठी या प्रशिक्षणार्थीची ससेहोलपट सध्या सुरू आहे. काहींना तीन महिन्यांचे मानधन मिळाले तर काहींना अजूनही एकदाही मानधन मिळालेले नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी या युवकांकडून कौशल्य विकास कार्यालयाचे दररोज उंबरठे झिजवावे लागत आहेत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालये, खासगी अस्थापनांना तब्बल 5 हजार 680 बेरोजगार युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करू देण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यापासून ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मात्र प्रशिक्षणार्थींना वेळेवर मानधन काही मिळत नसल्याचे समोर आले आहे. कार्यालयाकडून तांत्रिक अडचण असल्याचे सांगण्यात येत असून काहींना मिळते तर काहींना अजिबात नाही. यामुळे युवक व युवती वैतागले आहेत.
उमेदवारांना उद्योजक, खासगी आस्थापनांतून कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे, त्यासाठी मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे (इंटर्नशिप) उपलब्ध करणे असे योजनेचे उद्दिष्ट आहे. यातून बेरोजगारांनाही कामाचा अनुभव मिळणार आहे. दि. 9 जुलैपासून ही योजना सुरू करण्यात आली.त्यानुसार 12 वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना 6 हजार रुपये, आयटीआय उत्तीर्णला 8 हजार रुपये तर पदवीधारक प्रशिक्षणार्थींना 10 हजार रुपये मानधनावर 6 महिन्यांसाठी नियुक्त करण्यात आले. जिल्ह्यात असे 5 हजार 680 प्रशिक्षणार्थी नियुक्त करण्यात आले. या प्रशिक्षण कालावधीत बँक खात्यात (डीबीटी) राज्य सरकारकडून देण्यात येते. वयोमर्यादा 18 ते 35 अशी निश्चित करण्यात आली आहे. मात्र नियुक्तीपासूनच या प्रशिक्षणार्थींना कधीही मानधन वेळेवर मिळालेले नाही. अनेकांना तर नियुक्तीपासून ते देखील मिळालेले नाही, काहींना ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत मिळाली आहे तर काहींना तेही नाही. बहुसंख्य प्रशिक्षणार्थींना ऑक्टोबर- नोव्हेंबरचे मानधन मिळालेले नाही.
नियुक्त करण्यात आलेले प्रशिक्षणार्थी
जिल्हा परिषद 110, महापालिका 110, महसूल 933, पोलीस 45, आरोग्य (जिल्हा सरकारी रुग्णालय) 30, महावितरण 14, रस्ते वाहतूक महामंडळ 28, इतर सरकारी कार्यालये 173, खाजगी आस्थापनातून 1401.





