मुख्यमंत्री शिंदे ‘लाडक्या बहिणीं’च्या दारी; कुटुंब भेट मोहिमेला आजपासून सुरुवात

Eknath Shinde | राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या बँक खात्यामध्येही जमा झाला आहे. यातच आता ‘लाडकी बहीण योजने’सह राज्य सरकारच्या दहा महत्त्वपूर्ण योजनांची माहिती घरोघरी पोहोचवली जाणार आहे. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट’ मोहिमेची घोषणा सोमवारी केली.
या योजनेच्या अंतर्गत शिवसेनेच्या राज्यभरातील पदाधिकारी हे रोज 15 कुटुंबांना भेटून मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेचा आढावा घेतील. तसेच ज्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे त्या कुटुंबाला ती योजना कशी मिळणार यासंदर्भात मदत देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: 15 कुटुंबांना भेट देऊन माहिती घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन नव्या मोहिमेची माहिती दिली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कुटुंब आणि लाभ न मिळालेल्या कुटुंबांचीही भेट घेतली जाईल. त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेंतर्गत विशेष अॅपही सुरू करण्यात येणार आहे.
‘या’ योजनांची देणार माहिती
या मोहीमेतंर्गत शासनाच्या 10 पेक्षा जास्त योजना आहेत त्याचा लाभ मिळत आहे ना, याची चौकशी करून त्याबद्दल माहिती दिली जाणार आहे. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजनांबाबत कुटुंबांकडे विचारपूस केली जाणार आहे.
हेही वाचा:
कोळवाडी येथे मिनी बस व इर्टीगाच्या अपघातात आठ जखमी, दोन लहान मुले व एका महिलेची प्रकृती चिंताजनक.





