निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार ‘महायुती’चा मुख्यमंत्री – खासदार अशोक चव्हाण

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार महायुती सरकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच करणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण? हे महायुतीमधील सर्व पक्ष एकत्रित ठरवतील, असे देखील ते म्हणाले. विधानसभेला कोणाला किती जागा मिळतील हे पूर्णपणे तेथील परिस्थितीवर अवलंबन आहे. जिथे ज्या पक्षाची जिंकण्याची शक्यता आहे, तिथे त्या पक्षाला जागा दिली पाहिजे. असे देखील अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे राज्यात दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचे नाव घोषित करावे, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाने त्यांची ही मागणी फेटाळली आहे. त्यातच आता महायुतीमध्ये देखील पुढील मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर चव्हाण यांनी देखील असेच उत्तर दिले. याबाबतचा निर्णय निवडणुकीचा निकाल लागण्यानंतर घेतला जाईल, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या कार्यकाळातच मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेला वेग आला असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. दहा टक्के आरक्षणाचा देखील जनतेला फायदा झाला असल्याचे अशोक चव्हा यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलण्यात येते. मात्र, त्या बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहत नाही, असा आरोप देखील त्यांनी केला. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राजकीय नाही तर सामाजिक प्रश्न असल्याचा देखील ते म्हणाले.





