मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आज नेवाशात; बांधकाम मजुरांसाठी घेणार मोठा निर्णय

नेवासा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे हे बुधवार (दि.३१) जुलै रोजी नेवासा येथे भेट देणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम मजुरांसाठीच्या ‘तपासणी ते उपचार’ या महत्त्वाकांशी आरोग्य सेवा योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बांधकाम मजुरांना वर्षभर मोफत औषधोपचाराची हमी देणारे ‘आरोग्यपत्र’ (हेल्थ कार्ड) यावेळी हजार मजुरांना वितरित करण्यात येणार आहे.
तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नेवासा तालुक्याकरिता एक रुग्णालय अंगीकृत करण्याची घोषणा होण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यातील रुग्णांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून आर्थिक हातभार लागून त्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी समर्पण फांऊडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले म्हटले आहे.
या कार्यक्रमाला आरोग्य उपक्रमाचे समन्वयक अनंत पवार, इर्जिकचे अध्यक्ष डॉ.भारत कर्डक यांच्यासह समर्पण मजदूर संघाचे राजेंद्र थोरात हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी दमा खोकला टीबी यांसारखे छातीचे विकार असणाऱ्या रुग्णांना शासनाच्या मोबाईल एक्स-रे सुविधेद्वारे एक्स-रे व पुढील उपचार मोफत मिळणार असल्याची माहीती डॉ. घुले यांनी दिली. तसेच बांधकाम मजुरांसाठीचा फिरता दवाखाना म्हणजेच मोफत ॲम्बुलनन्स सुविधेचे लोकार्पण देखील होणार असून ही सेवा बुधवार (दि.३१) पासून जिल्हाभर सुरू होणार आहे





