मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या 7, 8 व 9 या 3 खंडांसह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर व इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबडेकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड 7, 8 व 9 ची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनता हे वृत्तपत्र 1930 ते 1956 दरम्यान प्रकाशित झाले होते. हे वृत्तपत्र आंबेडकरी चळवळीचा एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे अप्रकाशित व प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून ते सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपरोक्त खंडांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, समितीचे सदस्य सचिव डॉक्टर प्रदीप आगलावे, सदस्य योगीराज बागूल, ज. वि. पवार, डॉक्टर संभाजी बिरांजे आदींसह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. आत्तापर्यंत डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने जनताचे 6 खंड प्रकाशित केलेत.