पिंपरी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली पूरग्रस्तांची विचारपूस

पिंपरी, (प्रतिनिधी) – पवना नदीकाठच्या नागरी वस्त्यांना पूराचा फटका बसल्यानंतर सुरक्षितठिकाणी स्थलांतर केलेल्या नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि.5) भेट घेतली.
या पाहणी दौर्यादरम्यान त्यांनी स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधत, महापालिकेच्या वतीने पुरविल्या जाणार्या सोयी सुविधांबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना सूचना केल्या.
अतिवृष्टीमुळे तसेच धरणातून सातत्याने होणार्या विसर्गामुळे शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या स्थळांची पाहणी करून धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणार्या सुमारे 1000 नागरिकांना काल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
ह क्षेत्रीय कार्यालय हद्दीत जुनी सांगवी येथील मुळानगर, मधुबन सोसायटी येथील 118 नागरिकांना महापालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पूरग्रस्तांच्या भेटीला जुन्या सांगवीतून सुरुवात केली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळेला भेट दिली.
यादरम्यान त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. तुम्हाला काही अडचण आहे का? तुम्हाला जेवणाची सोय आहे का? अशी विचारणा केली.
यावर पूरग्रस्तांची सकारात्मक उत्तरे आली. यादरम्यान मुख्यमत्रीं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी महापौर माई ढोरे आणि स्थानिक माजी नगरसेविका शारदा सोनवणे यांच्याकडून माहिती जाणून घेतली तसेच आयुक्तांसोबत चर्चा करत आवश्यक सूचना केल्या.त्त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील दौर्याकरिता रवाना झाले.
यावेळी विधानपरिषद उपसभापती आमदार डॉ.नीलम गोर्हे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, महापालिका आयुक्त शेखर सिंह,
माजी महापौर माई ढोरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, सागर आंगोळकर, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, प्रशांत शितोळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर उपस्थित होते.
पूरबाधित नागरिकांना लवकरात लवकर मदत करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळेत स्थलांतरित केलेल्या पूरग्रस्त नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या पाहणी दौर्यावेळी पिंपरी-चिंचवडमधील पूरबाधित नागरिकांना महायुती सरकारकडून लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
महायुतीचे पदाधिकारी दिसले एकत्र
एरव्ही क्वचितच एकत्र दिसणारे महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी मुख्यमंत्री आल्यावर मात्र एकत्र दिसले. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्िथत होते.





