नवी मुंबई : राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी रेड कार्पेट अंथरले आहे. यातूनच लाडकी बहीण, भाऊ, शेतकऱ्यांपाठोपाठ आता लाडक्या उद्योजकांनाही सवलती देण्यात येत आहेत. यामुळेच सेमीकंडक्टर सारखे प्रकल्प राज्यात येत आहेत, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. सेमीकंडक्टर प्रकल्पातील चीप समर्पितचा कार्यक्रम 2026 मध्ये होईल, तेव्हा आमचेच सरकार सत्तेवर असेल, असा दावाही त्यांनी केली. नवी मुंबई येथे आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. मराठी माणूस युनिक, अद्ययावत आणि वेगळ्या क्षेत्रात क्रांती घडविण्याचे काम करतोय. यामुळेच राज्य सरकार आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या पाठीशी आहे. बांधकाम प्रकल्प राज्यासाठी गेमचेंजर ठरत आहेत. त्याचप्रमाणे सेमीकंडक्टर प्रकल्प देशासाठी महत्वाचा ठरणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आधीच्या सरकारकडून उद्योगांना मदत मिळत नव्हती. यामुळेच उद्योग राज्यातून निघून गेले. परंतु आमचे सरकार आले आणि आम्ही उद्योग वाढीसाठी अनेक करार केले. तसेच त्यांना सवलती दिल्याने राज्य औद्योगिक मित्र बनले आहे, असा दावाही त्यांनी केला.