Nagpur News | नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात दाखल होणार आहे. या दौऱ्यात ते वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या या बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा आढावा घेतला जाणार आहे. सोबत हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थिती व उपायोजना संदर्भात मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय शहरातील कर्फ्यूबाबत देखील फडणवीस यांच्या उपस्थितीत निर्णय होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नऊ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू आहे, त्यामुळे व्यापारी व हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. कर्फ्यू हटविण्याची मागणी जोर धरत आहे. या स्थितीत मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Nagpur News | पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना सोडणार नाही; फडणवीसांचा इशारा 19 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचाराबाबत विधानसभेत महत्वाची माहिती दिली होती. ‘नागपूर हे नेहमीच शांतताप्रिय शहर राहिले आहे. 1992 च्या जातीय तणावाच्या काळातही शहरात दंगल झाली नाही. मात्र यावेळी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हिंसाचार भडकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडणार नाही. ते कोणत्याही कबरीत लपले तरी त्यांना कबरीतून बाहेर काढून कारवाई करू,’ असा इशारा फडणवीसांनी दिला होता. Nagpur News | फहीम खानचा जामीनसाठी अर्ज दाखल दरम्यान, लोकांना चिथावणी देऊन हिंसाचार केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या फहीम खानने त्याच्या जामीनसाठी सत्र न्यायालयात वकिलामार्फत अर्ज दाखल केला आहे. त्यावरील सर्व आरोप खोटे असून जामिनावर मुक्तता करण्यात यावी, असे त्याने आपल्या जामीन अर्जात म्हंटले आहे. सध्या फहीम खानला वैद्यकीय कारणावरून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. Nagpur News | हेही वाचा: summer news : उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या, धोके !