पिंपरी | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज मावळात

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (शुक्रवार, दि.४ ऑक्टोबर) मावळ दौऱ्यावर येणार आहे.
या दौऱ्यात अगोदर एकविरा देवी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होइल.
कार्ला गडावरील कार्यक्रमानंतर दुपारी २ वाजता कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय लोकार्पण होइल. तसेच लायन्स व टायगर पॉइंट ग्लास स्काय वॉकचे भूमिपूजन आणि तालुक्यातील पवना व इंद्रायणी नदीवरील पूल व विविध विकासकामांचे एकाच ठिकाणावरुन भूमिपूजन व लोकार्पण होइल.
यानंतर दुपारी ४ वाजता सुदुंबरे येथील संत जगनाडे महाराज समाधी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन होणार आहे.
मुख्यमंत्री घेणार एकविरा देवीचे दर्शन
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (दि.४) मावळ दौऱ्यावर असून यात ते कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन घेणार आहेत.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत गडावरील पायऱ्यांची दुरूस्ती, संरक्षण भिंत, मुख्य मंदिराची दुरूस्ती, विश्रांती कक्षाच्या अशा ३९.४३ कोटी रुपयांचा कामांचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनाी दिली.
अजित पवारांची जाहीर सभा
कार्ला गडावरील विकास कामांचे भूमिपूजन झाल्यानंतर कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार हे करतील.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाजवळच अजित पवार यांची जाहीर सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे.
अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. तसेच यावेळी आजी-माजी आमदार, खासदार, विविध पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.





