सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांनी मूळगावी दिली भेट

राजगुरुनगर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांनी मूळगावी श्रीक्षेत्र यमाई कनेरसर ता खेड येथे भेट दिली. यावेळी कनेरसर गावात त्यांना मोठी सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचुड हे येत्या १० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असताना कनेरसर ग्रामस्थांच्या आग्रहास्तव नियोजित वेळेनुसार ते कनेसर येथे आले होते. त्यांनी त्यांच्या वडीलोपार्जित चंद्रचुड वाड्याला भेट देऊन पहाणी केली.
वाड्यातील देवघरातील लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन घेऊन कुटुंबीयांची भेट घेत जून्या आठवणींना उजाळा दिला.येथील ग्रामदैवत कुलस्वामिनी यमाई देवीचे सरन्यायाधीश डॉ. धनजंय चंद्रचुड यांनी सपत्नीक दर्शन घेतले. सरन्यायाधीश यांच्या स्वागतासाठी गावातील ग्रामस्थासह पंचक्रोशीतील नागरीक तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी वकील, शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या वतीने बाबाजी दौंडकर, लक्ष्मण ताम्हाणे यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड आणि पत्नी कल्पना चंद्रचूड यांना मानपत्र देऊन सन्मानित केले.राजगुरुनगर बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अँड रोहिदास टाकळकर यांनी त्यांचा सत्कार केला. कल्पना चंद्रचूड यांचा शासनाच्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे यांनी सन्मान केला.
सत्काराला उत्तर देताना सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड म्हणाले, कनेरसर गावात प्रवेश केल्यापासून ते आता तुम्हा सर्वांशी संवाद साधेपर्यंत अतंर्मनात संत ज्ञाेश्वरांची एक ओळ वारंवार व्यक्त होत आहे.आजी सोनियाचा दिनु ।वर्षे अमृताचा घनु ॥१॥ त्याचे कारण म्हणजे, तुम्ही लोकांनी दर्शविलेले निरपेक्ष प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी,काळ बदलतो तस माणूस देखील बदलतो.
आपल्या गावात किती बदल झाला आहे. मी लहान पणी येथे यायचो. प्रत्येक खेपेला आपल्या गावात किती बदल झाला आहे. किती प्रगती झाली आहे हे जाणून घ्यायचो. आपल्याला पूरक आणि पोषक बदल स्वीकारत विकसित होण्याचा प्रयत्न करतो. असे करताना, आपल्या मातीचा वारसा पुढे चालवत एक एक पिढी बदल स्वीकारत पुढे स्थलांतर करते. हे चिरंतन सत्य आहे.
आयुष्यात एक एक पाऊल पुढे टाकत असताना खोलवर रुजलेली आपली नाळ आपली मूळ, आपण विसरत नाहीत.आपल्या मूळ गावी आज भेट देताना मला माझ्या पूर्वजांचा, माझ्या या गावाचा, या मातीचा या लोकांचा अभिमान वाटतो. कामाच्या व्यस्ततेमुळे मला येथे दर महिन्याला येता येत नाही. पण मला येथील गावकरी मेसेज द्वारे, पत्रव्यवहार करून संपर्क करत असतात. त्यांच्या अडचणी समस्या सांगत असतात. आपले पूर्वज या मातीतून घडले. त्यांचें ऋण आपण मानतो. त्यांची आठवण मनात साठवतो. कधी तरी काळाच्या ओघात प्रत्येक वेळी ते पुन्हा पाहण्याची तेथे भेट देण्याची सतत संधी मिळेलच असे नाही.
सर न्यायाधीश चंद्रचुड पुढे म्हणाले ,आज माझ्या मूळ गावी भेट देताना ते माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. मला तुम्हाला एक सांगायचं..! एक निरोप द्यायचा आहे. एक संदेश द्यायचा आहे. तो म्हणजे ‘महिला सशक्तीकरणासाठी आठ वर्षांपूर्वी हे काम मी सर्वोच्च न्यायालयात केलं. महिलांना त्यांचे हक्क कसे देऊ शकतो. त्यांचे सशक्तीकरण कसे करु शकतो यावर भर दिला आहे. माझ्या निर्णयामुळे लष्करात महिला आज पर्मनंट कमिनर या पदावर काम करत आहेत.
तसेच चीन, पाकिस्तान या देशांच्या सीमेवर, वायुसेनेत, नेव्हीत महिला काम करत आहेत. आपण ज्या ठिकाणी राहतो तेथील महिलाचे सशक्तीकरणासाठी. ज्या क्षेत्रात संधी आहे तेथे प्रोत्साहन देण्यासाठी. आज महिला सशक्तीकरणाची भावना माझ्या आईमुळे निर्माण झाली. आमची आजी आणि पणजी यांनी गाव सोडून ९ मुलांना घेऊन कनेरसर वरुन पुण्याला आल्या. कारण त्यांना वाटले की मुलांना शिक्षण कसे देऊ शकेल. पुरुष मंडळी गावी कनेरसरला राहिले. मात्र घरातील महिलांनी मुलांना पुण्यात आणुन एका खोलीत राहिल्या. सर्व दागिने विकून मुलांना शिक्षण दिले.
त्यांच्यातले सर्वजण वेगवेळ्या क्षेत्रात विविध पदांवर त्यांनी काम केले. महिलांमुळे परिवार किती पुढे जाऊ शकतो हे आपल्याला यातून समजते. माझी पत्नी देखील महिला सशक्तीकरणासाठी कार्यरत असते. आम्ही दोन मुली दत्तक घेतल्या आहे. या मुलींचा सांभाळ करत असताना जीवनाचे कित्येक पैलू त्यांच्यामुळे आम्हाला समजले. यमाई देवीच्या कृपेने मी भारताचा सर न्यायाधीश झालो.
काही महत्त्वाचे निर्णय घेत असताना काही सुचत नाही आपल्याला.! जेव्हा अयोध्येचे काम माझ्याकडे आले तेव्हा आम्ही ३ महिने त्याच्यावर विचार करत होतो. कित्येक वर्ष ज्या विषयावर मार्ग निघाला नाही. यावर मार्ग कसा शोधायचा यावर मी विचार करायचो. मी दररोज देवपूजा करताना यावर मार्ग कसा काढायचा याविषयी प्रार्थना करायचो. देवावर आपली श्रध्दा असेल, आस्ता असेल तर कठीण प्रसंगी देव नेहमी आपल्याला मार्ग शोधून देतात. सरन्यायाधीश झाल्यावर संपूर्ण देशभरात फिरलो पण कनेरसर सारखे गाव मला कूठे पाहायला मिळाले नाही.
याप्रसंगी राजगुरुनगर येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस सय्यद, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. पोळ, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे,राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड रोहिदास टाकळकर उपस्थित होते.
तसेच खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, खेड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष हिरामण सातकर, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजसिंह शिंदे पाटील संचालक बाळासाहेब सांडभोर,प्रा. प्रकाश चौधरी, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलचे अध्यक्ष अँड अरूण मुळूक, अँड देविदास शिंदे, सरपंच सुनीता केदारी उपस्थित होते.
सामजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे, दिलीप माशेरे, पंकज दौंडकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ,नागरिक खेड वकील बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जवाहर दौंडकर यांनी केले. तर सूत्रसंचालन श्रीमती फड यांनी तर आभार अनंतकाका चंद्रचूड यांनी मानले.
सरन्यायाधीस.डाॅ.धनंजय चंद्रचूड यांचे वडील स्वर्गीय यशवंतराव चंद्रचूड हे १९७८ते १९८५ या कालावधीत भारताचे १६ वे सरन्यायाधीश होते.सर्वात मोठा सात वर्षाचा कालावधी त्यांना लाभला होता.पिता-पुत्र सरन्यायाधीश होण्याचा दुर्मीळ योग साधला गेला आहे. परंतु यापुर्वीही न्या.भगवती पिता-पुत्रांनी सरन्यायाधीशपद भूषविले आहे. न्या.चंद्रचूड पिता-पुत्र ही दुसरी जोडी ठरली आहे.
देशातील अनेक महत्वाच्या न्याय -निवाड्यामध्ये गेली अनेक वर्षे मोलाची भुमिका न्या.डाॅ.धनंजय चंद्रचूड यांनी निभावली आहे .२०१२ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री असताना ४ची बोर्ड परिक्षा घेण्याचा २००२ मध्ये शासनाने निर्णय घेतला होता. न्या.डाॅ.धनंजय चंद्रचूड यांनी तातडीने तो रद्द केला.
राम जन्मभूमी खटल्यातील पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठामध्येही त्यांचा समावेश होता,त्याबाबतचा ऐतिहासिक निकाल खंडपीठाने दिला होता.सध्याच्या महाराष्ट्र शासना संदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयात असून त्या घटनापीठाचेही डाॅ.धनंजय चंद्रचूड हे अध्यक्ष आहेत. न्या.धनंजय चंद्रचूड यांचे पिता न्या.स्वर्गीय यशवंतराव चंद्रचूड यांनी सर्वाधिक काळ भारताचे सरन्यायाधीशपद भूषविले आहे.
त्यांचे वडील स्वर्गीय विष्णु चंद्रचूड हे १९१२ साली एलएलबी परिक्षेत राज्यात प्रथम, स्वतः यशवंतराव चंद्रचूड हे १९४२ साली व त्यांची मुलगी १९७१ साली एलएलबी परिक्षेत राज्यात सर्वप्रथम आले होते व “चंद्रचूड घराण्याची आगळीवेगळी हॅटट्रिक ” म्हणून सदर घटनेस ओळखले जाते. “चंद्रचूड घराण्याची आगळीवेगळी हॅटट्रीक”म्हणून यास ओळखले जाते.
न्या.डाॅ.धनंजय चंद्रचूड यांची दि.२९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्ती झाली.दि.३१ ऑक्टोबर २०१३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदी त्यांची पदोन्नती झाली.दि.१३ मे २०१६ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी सेवाज्येष्ठतेनुसार भारताचे सरन्यायाधीशपदाची न्या.धनंजय चंद्रचूड यांनी शपथ घेतली.





