पुणे जिल्हा | सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड रविवारी कनेरसरला देणार भेट

दावडी, (वार्ताहर) – भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड हे रविवारी (दि. 20) खेड तालुक्यातील कनेरसर गावाला भेट देणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते, लेखक अशोकराव टाव्हरे यांनी दिली.
कनेरसर हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे गाव आहे. येत्या 10 नोव्हेंबर रोजी चंद्रचूड हे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होणार आहेत.
कनेरसर ग्रामस्थांच्या मागणीनुसार आपल्या गावी भेट देत असून ही घटना अभिमानास्पद असून ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून मानपत्र देऊन सन्मान करणार असल्याचे सरपंच सुनीता केदारी, अनंतकाका चंद्रचूड, दिलीपराव माशेरे यांनी सांगितले.
सरन्यायाधीश डॉ धनंजय चंद्रचूड यांचे वडील स्व. यशवंतराव चंद्रचूड हे 1978 ते 1985 असे सात वर्षे भारताचे सरन्यायाधीश होते. सर्वाधिक कालावधी त्यांना लाभला होता.
यशवंतराव चंद्रचूड यांचे वडील विष्णु चंद्रचूड हे 1912 मध्ये एलएलबी परीक्षेत राज्यात प्रथम, स्वतः यशवंतराव चंद्रचूड हे 1942 मध्ये व त्यांची मुलगी 1971 मध्ये एलएलबी परीक्षेत राज्यात प्रथम आले होते. चंद्रचूड घराण्याची आगळीवेगळी हॅटट्रीक म्हणून यास ओळखले जाते.
अशी आहे कारकिर्द
डॉ. धनंजय चंद्रचूड यांची दि.29 मार्च 2000 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, दि.31 ऑक्टोबर 2013 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी पदोन्नती,
दि.13 मे 2016 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी तर दि. 9 नोव्हेंबर 2022 रोजी सेवाज्येष्ठतेनुसार भारताचे सरन्यायाधीशपदाची धनंजय चंद्रचूड यांनी शपथ घेतली.
या खटल्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका
रामजन्मभुमी खटल्यातील घटनापीठात त्यांचा समावेश होता. त्याबाबतचा ऐतिहासिक निकाल खंडपीठाने दिला होता.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना चौथीची बोर्ड परिक्षा रद्द करण्याचा क्रांतीकारी निर्णय न्या.धनंजय चंद्रचूड यांनी दिला होता. देशातील अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे योगदान आहे.
भारातातील दुसरी जोडी
भगवती पिता-पुत्रानंतर सरन्यायाधीशपदी नियुक्त होणारी भारतातील दुसरी चंद्रचूड पिता-पुत्रांची जोडी आहे. यशवंतराव चंद्रचूड हे सुद्धा सरन्यायाधीश असताना 1985 साली कनेरसरला आले होते,
त्याचप्रमाणे स्वतः सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड हे कनेरसर गावाला भेट देत असल्याने आठवणींना उजाळा मिळाल्याचे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले.

