आया रे तुफान! दोन्ही राजांची शब्दरूपी सेवा… ‘या’ मराठमोळ्या लेखकाने लिहिलंय ‘छावा’ चित्रपटातील गाणं

Chhaava Movie : सध्या अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. 14 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर रिलीज होणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरपासून ते गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटातील ‘आया रे तुफान’ हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या सुंदर गाणे एका मराठी लेखकाने लिहिले आहे.
‘आया रे तुफान’ हे गाणे ए आर रेहमान व गायिका वैशाली सामंत यांनी गायले आहे. तर गाण्यातील सुंदर शब्द कागदावर उतरवण्याची किमया केली आहे क्षितिज पटवर्धन यांनी. क्षितिज यांनी याआधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचीही काही अप्रतिम गाणी लिहिली आहे. तर आता छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटातही त्यांना गाणे लिहिण्याची संधी मिळाली. याविषयी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आयुष्यात कृतकृत्य झाल्याचा अनुभव मिळाला असल्याचे म्हटले आहे.
‘छावा’तील ‘आया रे तुफान’ या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. यानिमित्ताने क्षितिज यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘छावा’च्या ‘आया रे तुफान’च्या निमित्ताने…आयुष्यात कृतकृत्य झाल्याचा अनुभव मला “माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रे” गाण्याला मिळत असलेल्या प्रेमानं येत असतानाच, छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगणार गाणं लिहायची जबाबदारी आली आणि वाटलं आपण खरंच भाग्यवान आहोत की, आपल्याला दोन्ही राजांची शब्दरूपी सेवा करता आली.
View this post on Instagram
‘ए आर रेहमान सरांसह या निमित्ताने पहिल्यांदाच काम केलं. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सर, निर्माते दिनेश विजन सर, हे गाणं ज्यांच्या बरोबर लिहायचं भाग्य लाभलं ते इर्शाद कामिल सर, या सगळ्यांचा आजन्म ऋणी आहे. आपली लाडकी गायिका वैशाली सामंत हिने हे गाणं गायलं आहे. ‘छावा’ मराठी मातीने देशाला दिलेली आणखी एक अनमोल देणगी ठरावी, ह्या सदिच्छेसह गाणं सादर करतोय “आया रे तूफान!”
“भगवे कि शान में चमका आसमान, आया आया आया रे तूफान! एक आंख में पानी, एक में अरमान, आया आया आया रे तूफान!, असे लिहित क्षितिज यांनी भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, ‘छावा’मध्ये विकी कौशलसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा या कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.





